हाँगकाँगमध्ये वयोवृद्ध पांडाने दिला जुळ्या पिल्लांना जन्म

हाँगकाँगमध्ये वयोवृद्ध पांडाने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. दोन पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची पांडा माता ठरली आहे. पांडाने एक नर आणि दुसरे मादी जातीच्या पिल्लाला जन्म दिला आहे. ओसियन पार्कमधील या पिल्लांच्या आगमनाने सारेच सुखावले आहेत. या पार्कमध्ये ही पांडा 2017 पासून राहत आहे. या पांडाचे नाव यिंग यिंग असे आहे. या पांडाचे वय 19 वर्षे असून तिने तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या जुळ्या पिल्लांना जन्म दिला.

पांडाचे वय वाढल्यानंतर गर्भधारणेची शक्यता कमी होते. जितके जास्त वय तितकी गर्भधारणा कमी असते. परंतु, या पांडाने या वयातही जुळ्या पिल्लांना जन्म दिल्याने ओशियन पार्कमधील कर्मचारी सुखावले आहेत. दोन पिल्लांपैकी एकाचे वजन 122 ग्रॅम आहे, तर दुसऱ्या पिल्लाचे वजन 112 ग्रॅम आहे. सध्या दोन्ही पिले 23 तास इंटेंसिव्ह केअरमध्ये आहेत. पुढील काही महिने ती लोकांसमोर ठेवली जाणार नाहीत. सध्या ती अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहेत.