कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यामुळे वाचले निवडणुकीसाठी तैनात अधिकाऱ्याचे प्राण

1080

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका सुरळितपणे पार पडल्या. मतदानाच्यावेळी आणि मतमोजणीच्या वेळी कामावर तैनात असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. 21 तारखेला म्हणजेच मतदानाच्या दिवशी एक अवघड प्रसंग घडला होता. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील चंदारामजी शाळेमध्ये जर कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तत्परता दाखवली नसती तर एका अधिकाऱ्याचे प्राण गेले असते.

निवडणूक अधिकाऱ्यांप्रमाणे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण असतो. सुट्ट्या रद्द होणं, सतत कराव्या लागणाऱ्या ड्युटी, कामाचा ताण याच्याशी झुंजत पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असतात. चंदारामजी शाळेमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी आणि गिरकर तैनात होते. या शाळेतील एका ईव्हीएम मध्ये बिघाड झाला होता. ते दुरुस्त होत नसल्याने आलेल्या ताणामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी श्री.जयंत नामदेव डोले यांना हृदयविकाराचा झटका आला. हे कळताच पोलीस अधिकारी ज्ञानोबा सुर्यवंशी यांनी डोले यांना खांद्यावर उचलून घेतले आणि मतदान केंद्रावरुन रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांना गाडीत झोपवले. त्यांनी गाडी सर जे.जे. रुग्णालयात जात असताना डोले यांना पम्पिंग ट्रीटमेंट दिली. डोले यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सुर्यवंशी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. त्यांच्यामुळेडोले यांचे प्राण वाचले असून डोले यांच्या कुटुंबियांनी सुर्यवंशी यांचे व्यक्तीश: आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या