
मतचोरीच्या मुद्दय़ावर देशभरात रान उठवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत वादळ निर्माण केले. निवडणूक सुधारणांवरील चर्चेत भाग घेताना राहुल यांनी भाजप, निवडणूक आयोग व मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. निवडणूक आयोग सरकारच्या हातचे बाहुले बनलाय, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
लोकसभेत राहुल यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावरून सरकारला घेरले. ‘मतचोरी हे सर्वात मोठे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. भाजप आणि निवडणूक आयोग हातात हात घालून ते करत आहेत. हिंदुस्थानची लोकशाहीच उद्ध्वस्त करत आहेत’, असे ते म्हणाले. भाजप निवडणूक आयोगाला कसा चालवतो आणि वापरतो आहे याचे दाखलेच त्यांनी दिले.
विरोधकांना काय हवे!
- सर्व पक्षांना निवडणुकीच्या एक महिना आधी मशिन रीडेबल मतदार यादी द्या
- 45 दिवसांत सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा कायदा मागे घ्या
- ईव्हीएमची रचना नेमकी कशी आहे ते सर्वांना कळू द्या
- निवडणूक आयुक्तांना उत्तरदायी करा.
सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांच्या फैरी
- निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱया समितीवरून सरन्यायाधीशांना बाजूला का करण्यात आले?
- निवडणूक आयुक्तपदी कोण असावा यात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना इतका रस का?
- निवडणूक आयुक्त हे पदावर असताना त्यांना कारवाईपासून संरक्षण देणारा बदल कायद्यात का करण्यात आला? आयुक्तांना मोदींनी हे गिफ्ट का दिले?
- मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसांत नष्ट करण्याची तरतूद कायद्यात का केली?


























































