केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होत आहे. दुपारी तीन वाजता राजधानी दिल्लीमध्ये ही पत्रकार परिषद होणार असून यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. निवडणूक आयोग जम्मू-कश्मीरसह हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

आगामी काळात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळही संपणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबतही निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा आणि तत्कालिन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-कश्मीर आणि लडाख) विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याचे आदेश सरकारला दिले होते.

लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-कश्मीरमध्ये लवकरच निवडणूक लागेल असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीवेळी जम्मू-कश्मीर खोऱ्यात शांततेत मतदान झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने जम्मू-कश्मीरचा दौराही केला होता. त्यामुळे आज जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होईल.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-कश्मीरमध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करून त्याच महिन्यात निकाल घोषित करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा असेल. मात्र केंद्रशासित जम्मू-कश्मीरमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यामध्ये सर्वात मोठा रोडा सुरक्षा व्यवस्था हा आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये येथे दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवरही होऊ शकतो.