बॅलेट पेपरवरील निवडणुकीत तेलंगणात भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसचा मोठा विजय… 1537 जागा जिंकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणात मतपत्रिकेवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने सर्वाधिक वॉर्ड ताब्यात घेत मोठा विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा ‘बूस्टर डोस’ मानला जात आहे.

तेलंगणात 116 नगरपालिका, 7 महापालिका व पंचायत समित्यांचे निकाल आज घोषित झाले. आतापर्यंत 2995 वॉर्डांचे निकाल हाती आले असून त्यापैकी 1537 वॉर्ड काँग्रेसने जिंकले आहेत. भाजप, एमआयएम आणि बीआरएस या तिन्ही प्रमुख पक्षांना काँग्रेसने आस्मान दाखवले आहे. प्रमुख विरोधी पक्ष बीआरएस 781 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे वजन वाढले!

तेलंगणात रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा काँग्रेसला फायदा झाला. एमआयएमने समाधानकारक कामगिरी केली आहे. पेंद्रातील सत्तेची साथ असतानाही भाजपला जेमतेम यश मिळाले आहे.

शहरी भागात बीआरएसला झटका

तेलंगणाची सत्ता गमावल्यापासून के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती (बीआरएस) दुबळी होत चालली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या पक्षाला फारशी कामगिरी करता आलेली नाही. राज्याच्या शहरी भागात बीआरएसचा याआधी चांगला दबदबा होता. मात्र, यावेळी शहरांमध्ये बीआरएसला एकही जागा मिळाली नाही.

पक्षीय बलाबल

(जाहीर निकाल 2995)

काँग्रेस                    1537

बीआरएस                  781

भाजप                      336

एमआयएम                 70

अपक्ष                       183

इतर                           75

माकप                          3