विद्युत शॉक : भावाच्या सतर्कतेने बहीण बचावली, आईही जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shock

सामना प्रतिनिधी । मालवण

घरालगत रस्त्याच्या कडेस खेळत असताना विद्युत खांबास स्पर्श झाल्याने तीन वर्षीय मुलगी जखमी झाली. तिच्यासोबत असलेल्या भावाने तिचा पाय ओढत बाजूला खेचल्याने ती बचावली. मुलीला शॉक बसल्याचे दिसताच आईने धाव घेत तिला बाजूला केले मात्र दोघेही जखमी झाले. मेलीसा मनवेल शिवलकर, तृप्ती मनवेल शिवलकर वय-२८ अशी जखमींची नावे आहेत. दोघांनाही तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ही घटना आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान मेढा-राजकोट येथे घडली. सुर्दैवाने मोठी दुर्घटना टळली.

मेढा राजकोट येथे शिवलकर यांचे घर आहे. आज सायंकाळी घरालगतच्या रस्त्यावर असलेल्या वाळूत मेलीसा व तिचा भाऊ दोघे खेळत होते. यात या वाळूच्या बाजूला असलेल्या एका विद्युत खांबास मेलीसा हिचा स्पर्श झाल्याने शॉक बसला. बहीण जोरजरात हलू लागल्याने तिच्या लहान भावाने तिचा पाय ओढून ओरड मारली. त्यावर तत्काळ तिची आई तृप्ती यांनी तेथे धाव घेतली असता मुलीला शॉक लागल्याचे दिसून आले. तिने क्षणाचाही विलंब न करता तिला बाजूला केले. यात तिलाही शॉक बसल्याने तीही जखमी झाली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी आई व मुलीस तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक महेश जावकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती महावितरणला देत घटनास्थळी भेट देण्याची सूचना जावकर यांनी केली.

यात जखमी झालेल्या मेलीसा या मुलीची डॉ. अमोल झांटये यांनी तपासणी केली. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. तर आई तृप्ती हिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लहान भावाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.