उद्योगविश्व- पेहरावाची शान… फेटा

>>अश्विन बापट

पारंपरिक पेहरावाची शान आणखी वाढवतो तो फेटा. फेटा बांधण्याची एक कला आणि ती जोपासणारे कलाकारही वेगळी ओळख मिळवून असतात. फेटा बांधताना मन आणि मान ताठ ठेवणं गरजेचं आहे, असा आहे ‘फेटा आर्टिस्ट’ निहार तांबडेचा फंडा…

पारंपरिक पोशाखातली गोडी न्यारी असते, असं म्हटलं जातं. याच पारंपरिक पेहरावाची शान आणखी वाढवतो तो फेटा. फेटा बांधणीची ही कला जोपासणारे कलाकारही वेगळी ओळख मिळवून असतात. मराठमोळा निहार तांबडे त्यापैकीच एक. या वेगळ्या क्षेत्रात त्याने पाऊल कसं ठेवलं याबद्दल त्याला बोलतं केलं तेव्हा तो म्हणाला, “माझा मित्र रूपक मोरेचं लग्नसराईसाठीचा ब्रास बँड, फेटे यांचं दुकान आहे. जिथे मी जायचो, तिथेच माझी आणि फेटय़ांची गाठ पडली. रुपकने मला फेटा बांधणीतले बरेच बारकावे सांगितले. त्याच्या काकांकडूनही मला मार्गदर्शन मिळालं. फेटय़ांमधलं तांत्रिक अंग मी शिकलो. यू-टय़ूबवरचे काही व्हिडीओही मला यासाठी उपयुक्त ठरले.

 कला क्षेत्रातील माझ्या प्रवेशाबद्दल मी तुम्हाला सांगतो, एका कार्यक्रमात सुबोध भावेंनी परिधान केलेला फेटा पाहून हा फेटा आणखी चांगल्या पद्धतीने बांधता आला असता, अशा आशयाचा मेसेज मी त्यांना सोशल मीडियावरून केला. मग त्यांनीच मला “हा फेटा तूच बांधून दाखव’’ म्हणत माझ्यावर विश्वास दाखवला. ही माझी कला क्षेत्रातली सुरुवात. सुबोध भावेपासून सुरू झालेला हा प्रवास ‘पावनखिंड‘, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ या सिनेमांमध्येही कायम राहिला. या सिनेमांतल्या कलाकारांना फेटा बांधण्याची जबाबदारी मी पार पाडली. तर ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘माझा होशील ना’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नवरी मिळे हिटलरला’… अशा मालिकांमध्येही कलाकारांना मी फेटे बांधलेत. एका दिवसात 200 ते 400 फेटे बांधण्याचं कामही मी केलंय.

सोनी मराठीच्या एका कार्यक्रमात एका स्पर्धकाला मी बांधलेल्या फेटय़ाचं संगीतकार अजय-अतुल यांनी दिलखुलास कौतुक केलं. माझ्यासाठी तो खूप मोठा क्षण होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मी ‘फेटा आर्टिस्ट’ म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्यास मदतच झाली. सोनी मराठीचे पदाधिकारी अमित फाळके यांचंही मला नेहमीच मोलाचं सहकार्य राहिलंय.

 फेटे बांधताना कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्याव्यात, असं विचारलं असता निहारने सांगितलं, “फेटे बांधताना महत्त्वाची बाब म्हणजे फेटा बांधून घेणाऱयाने मन आणि मान ताठ ठेवणं गरजेचं असतं. मन ताठ ठेवावं म्हणजे आपण जो फेटा बांधतोय त्याला एक परंपरा आहे, ती मानाची गोष्ट आहे. त्याला ताठ मानेने आणि ताठ मनाने सामोरं जा, असंच मला म्हणायचंय. त्याच वेळी ज्याला फेटा बांधला जातोय, त्याला त्रास होणार नाही, अशाच पद्धतीने तो फेटा बांधला जायला हवा. फेटय़ाचा लूक हा 80 टक्के फेटय़ासाठी वापरण्यात येणारं कापड, 10 टक्के फेटा बांधणारा आणि 10 टक्के फेटा बांधून घेणारा यावर अवलंबून असतो. फेटा बांधणाऱयाची शरीरयष्टी, त्याच्या चेहऱयाची ठेवण याही गोष्टी फेटा बांधताना लक्षात घ्याव्या लागतात.

फेटा बांधणाऱया व्यक्तीला आपल्याबद्दल कम्फर्टेबल वाटावं म्हणून मी फेटा बांधताना स्वतःला अत्तर लावून मग त्या व्यक्तीला फेटा बांधतो. जेणेकरून त्या व्यक्तीसाठी वातावरण ऊर्जादायी राहील. फेटय़ाच्या कापडाबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे ते कापड कॉटन बेस असावं. फेटय़ाच्या कापडाची निवड चुकली तर ज्या व्यक्तीने तो फेटा घातलाय त्याला अनकम्फर्टेबल वाटत राहतं.  पैठणी किंवा सिल्कचा फेटा बांधणं हे जास्त चॅलेंजिंग आहे, असं माझं मत आहे. फेटा ही आपली शान आहे, आपलं वैभव आहे. ते टिकून राहावं यासाठी आणखी कलाकार तयार व्हावेत याकरिता मी सध्या कार्यशाळा घेतोय. ज्यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धुळे, कोल्हापूर अशा विविध भागांमधून मुलं सहभागी होतायत. ज्यामध्ये फेटय़ाचा मूळ गाभा, फेटय़ाची सुरुवात कुठून झाली इथपासून ते पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम या फेटय़ातून कसा साधला जातो, हेही मी सांगत असतो.

 फेटा आर्टिस्टबद्दल एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे जशी रंगभूषा आणि वेशभूषाकार यांना ओळख मिळते, तशी फेटा आर्टिस्टनाही ती मिळायला हवी. चित्रपट महामंडळाने, सांस्कृतिक मंत्रालयाने यासाठी पुढाकार घ्यावा आणि यासाठी मीही प्रयत्न करणार आहे. तसंच अनेकदा फेटा आर्टिस्टचं मानधन विलंबाने दिलं जातं. त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला योग्य वेळीच मिळायला हवा यासाठी मी आग्रही राहणार आहे, असंही निहारने गप्पांची सांगता करताना अधोरेखित केलं.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसरसीनियर न्यूज अँकर आहेत.)