
अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याचे स्वप्न अनेक हिंदुस्थानी बाळगत असतात. काही जण त्यासाठी गैरमार्गाचा वापर करतात अशा नागरिकांमुळे हिंदुस्थानची मोठी बदनामी होत आहे. असाच एक प्रसंग नुकताच समोर आला आहे. अमेरिकेच्या सरकारी संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आली आहे.
११ हिंदुस्थानी नागरिकांनी व्हिसा मिळवण्यासाठी मोठा कट रचला आहे. या नागरिकांनी दुकान मालकांशी हातमिळवणी करून दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्याचे नाटक रचले. असे करण्याचे कारण इतकेच होते की जेणे करून तिथले कर्मचारी स्वत:ला गुन्ह्याचे बळी म्हणून घेऊ शकतील.
अमेरिकेत U व्हिसा ( U Non Immigrant Status) मिळवण्यासाठी हा बनवा रचला गेला. जे लोक गंभीर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत आणि पोलीस तपासासाठी ज्यांनी मदत केली आहे, त्यांना अशा प्रकारचा U व्हिसा मिळतो.
रामभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांनी मॅसॅच्युसेट्स आणि इतर राज्यांमधील किमान सहा दुकानांमध्ये दरोडे टाकून घेतले. दरोडेखोर बनावट बंदूक दाखवून दुकानातील रोकड घेऊन पळायचे, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पाच मिनिटांनी पोलिसांना बोलवले जायचे.
यासाठी प्रत्येकाला पैसे दिलेले असायचे. सूत्रधाराने दुकानाच्या मालकांना जागा वापारण्यासाठी मोठा मोबदला दिलेला होता.
जितेंद्रकुमार पटेल, महेशकुमार पटेल, संजयकुमार पटेल, अमिताबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मितुल पटेल यांना मॅसॅच्युसेट्समध्ये अटक करण्यात आली असून, आज सकाळी बोस्टन येथील फेडरल कोर्टात (संघीय न्यायालय) हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. रमेशभाई पटेल, रौनककुमार पटेल, सोनल पटेल आणि मिन्केश पटेल यांना केंटकी, मिसूरी आणि ओहायोमध्ये अटक करण्यात आली असून त्यांची प्राथमिक सुनावणी पार पडली आहे. हे सर्वजण आगामी काळात बोस्टन येथील फेडरल कोर्टात हजर होतील.
व्हिसा फसवणुकीच्या या प्रकाराबद्दल पाच वर्षांचा तुरुंगवास, तीन वर्षे देखरेख आणि २.५ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. अशा नागरिकांमुळे देशाचे नाव खराब होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अशी आहेत आरोपींची नावे
जितेंद्रकुमार पटेल
महेशकुमार पटेल
संजयकुमार पटेल
दिपिकाबेन पटेल
अमिताबेन पटेल
रोनाकुमार पटेल
संगीताबेन पटेल
मिन्केश पटेल
सोनल पटेल
मितुल पटेल

























































