कर्जत, जामखेड व पाथर्डीवगळता अकरा तालुके झाले टँकरमुक्त

415

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आता टँकरची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. कर्जत, जामखेड व पाथर्डी वगळता जिल्ह्यातील उर्वरित अकरा तालुक्यांतील टँकरची संख्या शून्य झाली आहे. सध्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील मिळून 130 गावे व 515 वाड्यावस्त्यांसाठी 2 लाख 62 हजार 961 नागरिकांसाठी 158 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मागील वर्षी पडलेल्या अल्पपावसामुळे पाणीटंचाईचा सामना करणार्‍या नगर जिल्ह्यामध्ये यंदा श्रीरामपूर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले होते. उन्हाळ्यामध्ये तर टँकरने गेल्या अठरा वर्षांतील उच्चांकी आकडा गाठला होता. या काळात जिल्ह्यामध्ये तब्बल 873 टँकर सुरू होते. मान्सूनच्या आगमनानंतर टँकरची संख्या हळूहळू कमी होऊ लागली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार तर जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांमध्येच टँकर सुरू असल्याचे चित्र आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता, नगर, पारनेर, शेवगाव व श्रीगोंदे या अकरा तालुक्यांमधील टँकरची संख्या शून्य झाली आहे. या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या काळात पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता या तालुक्यांमधील टँकरची संख्या शून्यापर्यंत आली आहे. तर, दुसरीकडे कर्जत तालुक्यामध्ये यंदा सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला असून या तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये चारा व पाणीटंचाई आहे. त्यामुळे या तालुक्यातील 61 गावे व 360 वाड्यावस्त्यांवरील 1 लाख 7 हजार 24 नागरिकांसाठी 57 टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय पाथर्डी तालुक्यातील 22 गावे व 76 वाड्यावस्त्यांवरील 28 हजार 143 नागरिकांसाठी 24 टँकरद्वारे व जामखेड तालुक्यातील 47 गावे 79 वाड्यावस्त्यांवरील 1 लाख 27 हजार 794 नागरिकांसाठी 77 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

तालुकानिहाय पाऊस : यंदा 1 जून ते 3 ऑक्टोबर या काळात  जिल्ह्यामध्ये सरासरी 107 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये अकोले तालुक्यात 252 टक्के, संगमनेर 121 टक्के, कोपरगाव 124 टक्के, श्रीरामपूर 115 टक्के, राहुरी 97 टक्के, नेवासे 119 टक्के, राहाता 107 टक्के, नगर 94 टक्के, शेवगाव 87 टक्के, पाथर्डी 80 टक्के, पारनेर 98 टक्के, कर्जत 50 टक्के, श्रीगोंदे 92 टक्के व जामखेड तालुक्यात सरासरी 75 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

चारा छावण्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ : जिल्ह्यात सुरू असलेल्या चारा छावण्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबरला केवळ कर्जत तालुक्यांमध्ये 28 चारा छावण्या सुरू होत्या; मात्र, 30 सप्टेंबरला मुदत संपल्यामुळे या छावण्या बंद केल्या होत्या. कर्जत तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे येथील चारा छावण्या सुरू ठेवण्याची मागणी जोर धरत होती. त्यातच आता नव्याने चारा छावण्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे या तालुक्यातील चारा छावण्या सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या