डोनाल्ड ट्रम्पशी पंगा मस्कला महागात! दिवसभरात गमावले 150 अब्ज डॉलर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यातील मैत्री म्हणजे जय-वीरूची मैत्री असे मानण्यात येत होते. मात्र, ही मैत्री आता तुटली आहे. त्यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. याआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन कर-खर्च विधेयकावर पाठिंबा दर्शवला होता. यावर टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी जोरदार टीका केली आणि त्यातूनच या मैत्रीला तडे गेले.

मला माफ करा, मी आता सहन करू शकत नाही. या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या लोकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मस्क यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मस्क यांनी पंगा घेतला आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसला. दोघांमधील वादामुळेच टेस्लाचे शेअर्स कोसळले आणि त्यामुळे मस्क यांना मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या 24 तासांत, एलॉन मस्कची संपत्ती सुमारे 3 लाख कोटी रुपयांनी कमी झाली. विशेष म्हणजे हा आकडा पाकिस्तानच्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी मंजूर केलेल्या एकूण बजेटपेक्षा जास्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादादरम्यान, गुरुवारी टेस्लाचे शेअर्स 9.53% ने घसरले आणि ट्रेडिंग दरम्यान ते 14% पर्यंत घसरले. टेस्लाच्या शेअरच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे, कंपनीच्या बाजारमूल्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे मस्क यांनी दिवसभरात 150 अब्ज डॉलर गमावले आहेत.त्याचा परिणाम एलोन मस्कच्या एकूण संपत्तीवरही दिसून आला.

मस्कच्या इतर व्यवसायांवरही परिणाम!

एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील या वादामुळे टेस्ला गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच कंपनीचे भांडवलही अब्जावधी डॉलर्सने कमी झाले आहे. केवळ टेस्लाच नाही तर मस्कच्या इतर व्यवसायांवरही याचा परिणाम होऊ शकतो. इलेक्ट्रिक कार उत्पादनाबरोबरच, मस्कच्या स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) वरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.