शिवडी-वरळी बेस्ट प्रवासात अतिरिक्त 10 रुपयांचा भुर्दंड, एल्फिन्स्टन पूल बंद केल्याने प्रचंड गैरसोय

एल्फिन्स्टन पूल बंद केल्याने परळ, प्रभादेवी, शिवडी, वरळी परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. एल्फिन्स्टन पुलावरून धावणाऱया बेस्ट बस क्र. 162 या बसचा मार्ग बदलल्याने प्रवाशांवर अतिरिक्त 10 रुपयांचा भुर्दंड पडला आहे. बेस्ट उपक्रमाने या मार्गावर आधीच्या दरानुसार भाडे आकारणी करावी, अशी मागणी नियमित प्रवाशांकडून केली जात आहे.

शिवडी रेल्वे स्थानक ते वरळी गाव यादरम्यान बेस्टची बस क्रमांक 162 ची सेवा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या या बसफेरीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. या मार्गावर शिवडी ते वरळी गाव अशा प्रवासाचे 10 रुपये तिकीट होते. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याने आता 20 रुपयांचे तिकीट आकारले जात आहे. पूल बंद झाल्यामुळे बेस्ट बसला भारतमाता, करी रोडमार्गे वरळी गाव असा चार किमीचा वळसा घालावा लागत आहे. यामुळे दुप्पट तिकीट दर आकारले जात असल्याने याचा परळ परिसरातील रुग्णालयांत येणारे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, शाळकरी मुलांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल की नाही, याबद्दल शंका आहे. अशा स्थितीत नियमित प्रवाशांनी किती काळ आर्थिक भुर्दंड सोसायचा? बेस्ट उपक्रमाने याचा विचार करून आधीच्या दरानुसार 10 रुपयांचे तिकीट आकारून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे परळ येथील माजी शाखाप्रमुख रमेश सावंत यांनी केली आहे.