
मुंबईतील प्रभादेवी स्थानकाजवळील 113 वर्षे जुना ऐतिहासिक एल्फिस्टन पूल अखेर पूर्णपणे हटवण्यात आला आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष रात्रकालीन मेगा ब्लॉकदरम्यान या पुलाचा शेवटचा लोखंडी गर्डर यशस्वीरित्या काढण्यात आला. मध्य रेल्वेने या कामासाठी सलग तीन दिवस रात्रकालीन मेगा ब्लॉक घेतला होता. ज्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. या कामामुळे रविवारी सकाळीच लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची तारांबळी उडाली.
या मेगा ब्लॉकचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांच्या प्रवासात कपात करून त्या केवळ दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात आल्या. गाड्या एकाच ठिकाणी बराच वेळ थांबून राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेच्या या गोंधळमुळे काही प्रवाशांनी ट्रेनमधून उतरून रेल्वे रुळावर चालण्यास सुरूवात केली. जवळपास अर्धा पाऊण तास रेल्वे एकाच ठिकाणी थांबल्यामुळे लोकलमधील प्रवासी घामाघूम झाले होते. अशात लोकलसेवा दादरपर्यंतच असल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकांना पर्यायी मार्ग शोधावा लागला. यामुळे दादर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.अनेक प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकात पोहोचण्याठी उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी खाजगी वाहनांचा किंवा बसचा आधार घ्यावा लागला.
केवळ रेल्वेच नव्हे, तर रस्ते वाहतुकीवरही याचे पडसाद उमटले. पुलाच्या कामासाठी परिसरात मोठी यंत्रसामग्री तैनात असल्याने प्रभादेवी, दादर आणि वरळी परिसरातील वाहतूक अन्य मार्गांवर वळवण्यात आली होती. यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, विशेष रात्रकालीन ब्लॉक आता संपला असला तरी रविवारी होणारा नियमित मेगा ब्लॉक कायम राहणार आहे. एल्फिस्टन पुलाचे काम पूर्ण झाल्याने आता त्या ठिकाणी अधिक रुंद आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त नवीन पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























































