
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे दुबईला जाणारे एमिरेट्सचे विमान सोमवारी सकाळी पुन्हा कोचीला परतले. विमानाचे वेळापत्रक पुन्हा निश्चित करण्याबाबत किंवा प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.
विमानतळ प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमिरेट्सचे EK533 हे विमान सोमवारी पहाटे 4.30 वाजता कोचीहून दुबईसाठी उड्डाण केले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वैमानिकाला विमान माघारी वळवून पुन्हा कोचीला नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हे विमान कोची विमानतळावर परतले. विमानात एकूण 350 प्रवासी होते.
विमान कोचीला परतल्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण होते. सुरुवातीला विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना विमानातून उतरून घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, काही वेळातच दुबई विमानतळावरील परिस्थितीचा आढावा घेऊन विमान पुन्हा उड्डाण करू शकते, असे सांगत प्रवाशांना विमानातच थांबण्यास सांगण्यात आले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एअरलाइन्सने अखेर सर्व प्रवाशांना कोची विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला.




























































