
जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली तर त्या व्यक्तीला 24 तासात म्हणजेच दुसऱ्याच दिवशी त्याच्या पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम काढता येईल. त्या व्यक्तीला पीएफमधील पैसे काढण्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागणार नाही. जर ती व्यक्ती 12 महिने बेरोजगार राहिली तर त्या व्यक्तीला पीएफमधील संपूर्ण रक्कम काढता येईल, अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही नवीन नियम जाहीर करण्यात आले होते. नवीन नियमांनुसार नोकरी गेल्यावर पीएफ खात्यांमधून पैसे काढण्याच्या वेळेबाबत गोंधळ उडाला होता. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की आता सलग 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतर आणि नोकरी गेल्यानंतर पीएफमधील रक्कम काढता येईल. परंतु, कामगार मंत्र्यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर करून यासंबंधी माहिती दिली आहे. नवीन नियमांनुसार, जर एखादा ग्राहक एका दिवसासाठीही बेरोजगार असेल तर तो त्याच्या पीएफ बॅलन्सपैकी 75 टक्के रक्कम ताबडतोब काढू शकतो, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
पीएफमधील 13 नियम रद्द
ईपीएफओने पूर्वीचे 13 कठीण नियम रद्द केले आहेत. पीएफमधील पैसे काढण्यासाठी आता केवळ तीन नियम ठेवण्यात आले आहेत. आजारपण, शिक्षण आणि लग्न या तिन्ही कारणांसाठी पीएफमधील रक्कम काढू शकतील. पूर्वी शिक्षण आणि लग्नासाठी फक्त तीन वेळा पैसे काढण्याची परवानगी होती, परंतु आता शिक्षणासाठी 10 आणि लग्नासाठी पाच वेळा पैसे काढता येतील.