
जम्मू-कश्मीरचे डोडा आज पुन्हा हादरले. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये केरन येथे एक आणि डोडामध्ये दोन अशी तीन ठिकाणी धुमश्चक्री उडाली. डोडाअंतर्गत येणाऱया कास्तीगड येथील जद्दन बाटा गावात लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन जवान गंभीर जखमी झाले. तर केरन येथे दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. डोडाच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-कश्मीर पोलीस संयुक्तपणे शोध मोहीम राबवत असून हिंदुस्थानी जवान दोन दिवसांपासून प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांशी लढा देत आहेत.
15 जुलै रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले होते. 16 जुलै रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास डोडा येथील देसा वनक्षेत्रातील कलान भाटा आणि पंचन भाटा येथे पहाटे पुन्हा गोळीबार झाला. या घटनांनंतर लष्कराने शोधमोहीम तीव्र केली आणि जद्दन बाटा गावातील सरकारी शाळेत तात्पुरती सुरक्षा छावणी उभारली होती.
दहशतवादी परदेशी, पाकिस्तानी लष्कराकडून अद्ययावत प्रशिक्षण
जम्मू भागात मारले गेलेले दहशतवादी परदेशी असून त्यांनी पाकिस्तानी लष्कराकडून अद्ययावत प्रशिक्षण घेतल्याचे समोर आल्याची माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी दिली. कश्मीरमध्ये कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्थानिक तरुणांना दहशतवादात ढकलण्यात आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, दहशतवाद्यांची ताकद किती आहे, त्यांची कमजोरी आणि रणनीती लष्कराला समजली आहे. दहशतवाद्यांचा पूर्णपणे सफाया करण्यासाठी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रशिक्षित जवान आणि प्रगत शस्त्र आपल्याकडे आहेत. त्यामुळे लवकरच दहशतवाद्यांचा नायनाट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
z शोधमोहिमे दरम्यान पाच ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांना सुमारे 24 दहशतवादी लपल्याचा सुगावा लागला आहे.
z डोडा आणि कठुआ हे 5 महिन्यांपासून दहशतवादाचे केंद्र राहिले आहे. कठुआमधील बदनोटा ते डोडा येथील धारी गोटे आणि बग्गीपर्यंत सुमारे 250 किलोमीटर अंतरावर दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
z 20 चौरस किलोमीटरचा मोठा परिसर असून घनदाट जंगलातून दहशतवादी सहजपणे डोंगरावर चढून हल्ले करू शकतात, त्यामुळे या पर्वतांवर अन्नपदार्थ आणि दारुगोळा घेऊन जवानांना तैनात करण्यात आले आहे.
24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी 7 हजार जवानांची फौज
लष्कराने सर्वात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांचे 7 हजार जवान, 8 ड्रोन, हेलिकॉप्टर आणि सुमारे 40 स्निफर डॉग मोहिमेत तैनात करण्यात आले आहेत. या मोहिमेत विशेष कमांडोंचाही सहभाग आहे.
कुपवाडाच्या जंगलात धुमश्चक्री; दोन दहशतवाद्यांना पंठस्नान
उत्तर कश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराचे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना पंठस्नान घातले. लष्कराने ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
n बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कास्तीगड येथील जद्दन बाटा गावात लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात लष्कराचे दोन जवान गंभीर जखमी झाले. तर गुरुवारी पहाटे डोडा जिह्यातील जंगलात झालेल्या धुमश्चक्रीत आणखी 2 जवान गंभीर जखमी झाले. या जवानांना तत्काळ हवाई तळावरून उधमपूर येथे हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अतिशय प्रतिपूल हवामानात लष्कराचे जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
n लष्कराच्या कॅम्पवर हल्ला करून दहशतवादी जंगलात पळून गेले. सध्या जंगलात दहशतवाद्यांना शोधून काढण्याचे काम सुरू असून लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोहोबाजूंनी घेरले आहे. घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवादी अधूनमधून अंदाधुंद गोळीबार करत आहेत तर जवानही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
विजापूर येथे स्फोटात 2 जवान शहीद, 4 जखमी
विजापूर जिह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटत विशेष कृती दलाचे भरत साहू आणि सत्येर सिंग कांगे हे दोन जवान शहीद झाले आणि चार जण जखमी झाले. विजापूर-सुकमा-दंतेवाडा जिह्यांमधील सामाईक जंगलात नक्षलवादविरोधी कारवाईनंतर सुरक्षा कर्मचाऱयांचे संयुक्त पथक परतत असताना ताररेम भागात बुधवारी रात्री ही घटना घडली, असे येथील एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
दोन दिवस आधीच भावाला मिळाली खबर
बिजेंद्र आणि अजय नरुका या दोन जवानांची अंत्ययात्रा एकत्र निघाली. दोघेही राजस्थानच्या झुंझनू जिह्यातील आहेत. बिजेंद्रचे भाऊ दशरथही लष्करात होते. बिजेंद्र यांच्याबद्दल दशरथ यांना सोमवारीच माहिती मिळाली होती. परंतु, कुटुंबीयांना धक्का बसू नये म्हणून त्यांनी दोन दिवस त्यांना काहीच सांगितले नव्हते. दरम्यान, शहीद अजय नरुका यांच्या भैसवता कलां गावात 800 घरे असून गावात 300 जवान आणि 500 निवृत्त फौजी आहेत.