Ayodhya – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर!

देशात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, अयोध्येतून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणातील पीडित मुलगी ही अनुसूचित जातीची असून आरोपी हा दुसऱ्या समाजातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई करून आरोपीला अटक केली.

शाहबान असे त्या आरोपीचे नाव होते. 20 दिवसांपूर्वी खांदासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दलित अल्पवयीन मुलीवर शाहबानने बलात्कार केला होता. बलात्काराच्या वेळी आरोपीचा एक साथीदारही तिथे होता. घटनेनंतर आरोपी शाहबान आणि त्याचे साथीदार पळून गेले. यानंतर आरोपीने पीडितेच्या कुटुंबीयांना धमकवण्यास सुरूवात केली. 2 सप्टेंबर रोजी शाहबान त्याच्या साथीदारांसह पुन्हा एकदा पीडितेच्या घरी पोहोचला आणि तिला धमकावले.

एवढ्यावरच शाहबान थांबला नाही. यानंतरही तो रोज पीडितेला त्रास द्यायचा. या बाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री पोलिसांनी आरोपीला गावाबाहेर फिरताना पाहिले. यावेळी त्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच आरोपी शाहबानने स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला. दरम्यान, या चकमकीत शाहबानच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी तातडीने आरोपीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच त्याच्या विरोधात खांडसा पोलिस ठाण्यात एससी-एसटी कायदा, गैरवर्तन, पॉक्सो आणि धमकावणे या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीची झडती घेतली. शाहबानकडून एक अवैध पिस्तूल, एक काडतूस आणि एक जिवंत काडतूस जप्त केली आहे. याप्रकरणी पुढील तपासही सुरू केला आहे.