लोटस जेटीवर अतिक्रमण! बोटी विकण्यासाठी अनधिकृत ऑफिस थाटले

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून हाजीअली किनाऱ्यावरील लोटस जेटीची जागा बळकावून तिथे चक्क बोटी विकण्याचे ऑफिसच थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अलाऊद्दीन नवाझ खान या कथित मच्छीमाराने लोटस जेटीचा अनधिकृतपणे ताबा घेऊन किनाऱ्याची वाट लावली आहे. त्याच्या विरोधात स्थानिक कोळी बांधवांनी वेळोवेळी आवाज उठवूनही किंवा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे अलाऊद्दीनला कोणाचे अभय मिळतेय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

स्थानिक कोळी बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटस जेटीजवळ अलाऊद्दीनने दहशत निर्माण केली आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून वंचित मच्छीमार (हाजीअली) सहकार संघटन ही संघटनेचा बोर्ड लावला आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या तसेच गुजरात येथून जुन्या बोटी विकत घेऊन लोटस जेटीवर जागा अपुरी असताना विक्रीसाठी आणल्या आहेत. मासेमारीशी ज्या लोकांचा संबंध नाही, अश्या लोकांना या बोटी दोन लाखांपेक्षा जास्त रकमेने विकून समुद्रात मासेमारीसाठी पाठवत आहे. या अतिक्रमणाविरोधात तक्रार करण्यात आली असून पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. अलाऊद्दीनचा हा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे.

किनाऱ्याची लावली वाट
जुन्या, भंगारातील बोटी लोटस जेटीजवळ दाटीवाटीने उभ्या केल्या आहेत. त्यामुळे जेटीवर जाण्यासही जागा उरलेली नाही. किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात कचरा साचलेला आहे. किनाऱ्याची वाट लावली आहे, अशी प्रतिक्रिया लॉरेन्स फर्नांडिस या
स्थानिक मच्छिमाराने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या