ईडीने फास आवळला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोटय़वधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या मेहुल चोक्सीसारखे आरोपी कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाहीत त्यासाठी कायद्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

पीएनबी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला फरारी आरोपी मेहुल चोक्सी याची अंमलबजावणी संचालनालयाने सुमारे 1869 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय महागडे पेंटिंग्ज, गाडय़ा, शोपीस ताब्यात घेतले आहे. ईडीने चुकीच्या पद्धतीने हे मौल्यवान साहित्य जप्त केले असून ही कारवाई थांबवावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायमूर्तींनी मेहुल चोक्सी जर उद्या मुख्य खटल्यातून सुटला तर त्याच्या विरोधात ईडीने केलेली कारवाई व्यर्थ जाईल. त्यामुळे या आरोपींविरोधात कोणतीही कारवाई करताना कायदेशीर बाबी नीट तपासून घ्या, असे ईडीला बजावले. ईडीच्या वतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, चोक्सी आणि त्याच्यासारखे इतर आरोपी कायद्याच्या तावडीतून सुटूच शकणार नाही. त्यासाठी एफईओ या नव्या कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. खंडपीठाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.