मलानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंडचा झंझावाती फलंदाज डेव्हिड मलानने अवघ्या आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला निरोप देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या निर्णयाने मलानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

जून 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून डेव्हिडने पदार्पण केले होते. डावखुऱ्या मलाने कार्डिफमध्ये खेळलेल्या सामन्यात पहिल्याच सामन्यात 44 चेंडूंत 78 धावा ठोकल्या होत्या. त्याने आपल्या 62 सामन्यांच्या कारकीर्दीत 1892 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या एकाच मालिकेत टी-20 आणि कसोटी पदार्पण केले. मात्र त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. मलान आपल्या कारकीर्दीत 22 कसोटी, 30 वन डे आणि 62 टी-20 सामने खेळला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकवणारा मलान हा जोस बटलरनंतर एकमेव इंग्लिश फलंदाज आहे.

2019 साली जगज्जेतेपद मिळवणाऱ्या इंग्लिश संघातही मलान होता. सप्टेंबर 2020 मध्ये त्याने आपल्या धडाकेबाज खेळामुळे टी-20 क्रिकेट फलंदाजीच्या क्रमवारीत नंबर वन स्थान पटकावले होते. त्याने या वर्षी 24 सामन्यांत एक हजार धावांचा पल्ला गाठत विक्रमही केला होता. तसेच जून 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान 15 एकदिवसीय सामन्यात त्याने पाच शतके ठोकली होती.

निर्णय सोप्पा नव्हता

मी माझ्या क्रिकेटपासून समाधानी आहे. त्यामुळे मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी निश्चितच सोपे नव्हते. मला काहीतरी सिद्ध करायचे होते असे मला नेहमीच वाटत होते. मला जे साध्य करायचे होतेत ते मी केल्याचेही समाधान आहे.