IND vs ENG Test – पतौडी नव्हे तेंडुलकर-ऍण्डरसन करंडक

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटचा वाढत चाललेला रोमांच पाहून या देशांमधील मालिकेचे महान कसोटीपटू ऍलन बॉर्डर आणि सुनील गावसकर यांच्या नावाने बॉर्डर-गावसकर करंडक असे नामकरण करण्यात आले होते. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि जेम्स ऍण्डरसन यांचे नाव हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या पतौडी करंडकाला देण्यात आले आहे. 20 जूनपासून सुरू होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका ‘तेंडुलकर-ऍण्डरसन’ नावाने ओळखली जाईल.

क्रिकेट इतिहासात सर्वोत्तम कामगिरी करणाऱया खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून महान क्रिकेटपटूंची नावे दिली जात आहेत. त्याच पंक्तीत आता सचिन तेंडुलकर आणि जेम्स ऍण्डरसन हे दिग्गज विराजमान झाले आहेत. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक 15,921 धावा या सचिनच्या नावावर आहेत तर ऍण्डरसनने इंग्लंडसाठी सर्वाधिक 704 कसोटी विकेट टिपण्याचा पराक्रम केला आहे. मालिकेचे हे नामकरण करण्यापूर्वी इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळाने पतौडी परिवाराला या बदलाची कल्पना दिली. हिंदुस्थानात इंग्लंडविरुद्ध होणाऱया कसोटी मालिकेला ऍन्थनी डिमेलो करंडक म्हटले जाते. त्यामुळे या मालिकेचेही ‘तेंडुलकर-ऍण्डरसन’ असे नामकरण होणार की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचे केले नामकरण, अनेक मालिकांना कसोटीपटूंची नावे

कसोटी क्रिकेट इतिहासात अनेक मालिकांना महान कसोटीपटूंची नावे देण्यात आली आहेत. यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला इयान चॅपल आणि रिचर्ड हॅडली यांचे नाव देण्यात आले. तेव्हापासून उभय देशांमधील मालिका ‘चॅपल-हॅडली’ करंडक या नावाने ओळखली जाऊ लागली. तसेच इंग्लंड-वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेचे  ‘रिचर्ड्स-बॉथम’ करंडक असे नामकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे शेन वार्न आणि मुथय्या मुरलीधरन या महान फिरकीवीरांच्या नावाने ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यात ‘वॉर्न-मुरलीधरन’ करंडक खेळविला जात आहे. वेस्ट इंडीज-श्रीलंका यांच्यातील मालिका ‘सोबर्स-टिसेरा ’करंडक या नावाने ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सौरभ गांगुली आणि नैमुर रहमान दुरजॉय यांचे नाव देण्यात आले होते.

फलंदाजीच्या सरावासाठी राहुल हिंदुस्थान ‘अ’ संघात खेळणार, इंग्लंड लायन्सविरुद्ध आजपासून दुसरी कसोटी