इंग्लंडने सर्बियाचा 1-0 गोल फरकाने पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील आपल्या मोहिमेस प्रारंभ केला. या चुरशीच्या लढतीत जूड बेलिंगहॅमने 13व्या मिनिटाला मारलेला गोल निर्णायक ठरला. मात्र या लढतीपूर्वी इंग्लंड आणि सर्बियन समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जर्मन पोलिसांनी वेळीच ही हाणामारी आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. हा हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक मीडियातील माहितीनुसार, या हाणामारीत अल्बानिया संघाचे काही समर्थकही सहभागी होते. सर्बिया व अल्बानिया या पारंपरिक वट्टर प्रतिस्पर्धी फुटबॉल संघांच्या चाहत्यांमध्ये एका कॅफेमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर इंग्लंड संघाचे समर्थकही अल्बानियन चाहत्यांच्या मदतीला आले. त्यानंतर मोठा वाद होऊन हाणामारीला सुरुवात झाली. उभय समर्थकांनी एकमेकांच्या अंगावर अन् डोक्यावर टेबल, खुर्च्या फेकल्या. काचेच्या बॉटल्स फेकून मारल्या. काहींना लाथाबुक्क्यांनी तुडविण्यात आले. कॅफेतील वाद नेमका कोणामुळे सुरू झाला, हे समजले नाही. मात्र इंग्लंडचा एक समूह जेव्हा कॅफेमध्ये गेला, तिकडे आधीच सर्बियन चाहते होते. मग सर्वांनी एकमेकांना टेबल, खुर्च्या अन् बाटल्या फेकून मारायला सुरुवात केली. जर्मन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कॅफे परिसर रिकामा केला. सात सर्बियन चाहत्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
बेलिंगहॅमचा हेडर गोल
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास जूड बेलिंगहॅमने मधल्या फळीतील काईल वॉकरला एक सुरेख पास दिला. मग बेलिंगहॅमने बुकायो साकाच्या क्रॉसवर अफलातून सूर मारत हेडरने चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. बेलिंगहॅमने इंग्लंडसाठी सलग दुसऱया सामन्यात गोलचे खाते उघडले, हे विशेष. याआधी कतारमधील 2022च्या वर्ल्ड कपमध्ये इराणविरुद्धच्या लढतीत बेलिंगहॅमने इंग्लंडसाठी पहिला गोल केला होता. बेलिंगहॅम युरो 2020 व फिफा वर्ल्ड कप 2022मध्ये खेळल्यानंतर 21 वर्षांचा होण्यापूर्वीच तीन महत्त्वाच्या स्पर्धा खेळणारा एकमेव युरोपियन फुटबॉलपटू होय.