युरो चषक फुटबॉल स्पर्धा – जर्मनीकडून स्कॉटलंडचा धुव्वा

जर्मनीने दहा खेळाडूंनिशी खेळणाऱ्या स्कॉटलंडचा 5-1 गोलफरकाने धुव्वा उडवित युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप (युरो) स्पर्धेचा धडाकेबाज प्रारंभ केला. ऍण्टोनियो रोडिगरच्या 87 व्या मिनिटाला झालेल्या आत्मघातकी स्वयंगोलमुळे स्कॉटलंडच्या खात्यात एक गोल जमा झाला.

फ्लोरियन विर्ट्झने दहाव्या मिनिटाला गोल करीत जर्मनीचे खाते उघडले. मग जमाल मुसियालाने 19 व्या मिनिटाला गोल करीत ही आघाडी दुप्पट केली. काई हॅवर्टने पहिल्या हाफमधील इंज्युरी टाईममध्ये पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करीत जर्मनीला पूर्वार्धातच 3-0 अशी जोरदार आघाडी मिळवून दिली. स्कॉटलंडच्या रयान पोर्टियसच्या चुकीमुळे जर्मनीला ही पेनल्टी मिळाली होती. रेफरींनी पोर्टियसला लाल कार्ड दाखविल्यामुळे स्कॉटलंडला मध्यंतरानंतर दहा खेळाडूंनिशीच खेळावे लागले. मध्यंतरानंतर बदली खेळाडू निकोलस फुलक्रगने 68 व्या मिनिटाला गोल केला, तर एमरे कॅनने इंज्युरी टाईममध्ये गोल करून जर्मनीला दणदणीत विजय मिळवून दिला.