
यजमान जर्मनीने डेन्मार्कचा 2-0 गोल फरकाने पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. काई हॅव्हर्टझ व जमाल मुसियाला यांनी गोल करीत जर्मनीला अंतिम आठमध्ये पोहोचविले.
अंधुक प्रकाशामुळे पूर्वाधातील 20 मिनिटांचा खेळ रद्द करण्यात आला होता. जर्मनीने घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रोत्साहनाच्या जोरावर डेन्मार्कच्या गोलपोस्टवर हल्ले करायला सुरुवात केली. जर्मनीच्या निको श्लोटरबेकने मैदानी गोल केल्यानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला होता, मात्र फाऊलमुळे पंचांनी हा गोल नाकारल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. डेन्मार्कनेही जर्मनीवर प्रतिहल्ले करीत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यामुळे या तुल्यबळ लढतीत पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला.
मध्य़ंतरानंतर यजमान जर्मनीच्या खेळाडूंनी पुन्हा डेन्मार्कवर धोकादायक चाली रचायला सुरुवात केली. काई हॅव्हर्टझने 53व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करीत जर्मनीचे खाते उघडले. त्यानंतर जमाल मुसियाला याने 68 व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल करीत जर्मनीची आघाडी 2-0 अशी दुप्पट केली. मुसियालाचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला. त्यानंतर ही आघाडी टिकवत जर्मनीने विजयावर शिक्कामोर्तब करीत आगेकूच केली. आता उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीची गाठ स्पेन व जॉर्जिया यांच्यात बाजी मारणाऱया संघांशी पडेल.