फुटबॉल वर्ल्ड कप युरोपियन पात्रता फेरी; एम्बाप्पे, रोनाल्डो ठरले संकटमोचक, इंग्लंडचाही सर्बियावर दणदणीत विजय

फुटबॉल वर्ल्ड कपच्या युरोपियन पात्रता फेरीत किलियन एम्बाप्पे फ्रान्ससाठी, तर ख्र्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालसाठी संकटमोचक ठरले. एम्बाप्पेने निर्णायक गोल करून फ्रान्सला संकटातून बाहेर काढले, तर रोनाल्डोने विक्रमी गोल करीत पोर्तुगालला पराभवापासून वाचवले. इंग्लंडनेही सर्बियाचा 5-0 गोलफरकाने धुव्वा उडवित आपली विजयी घोडदौड राखली.

फ्रान्स, पोर्तुगाल व इंग्लंड या युरोपातील तीन फुटबॉल महासत्तांनी 2026 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रतेकडे दमदार पाऊल टाकले. एार्ंलग हॅलंडच्या चेहऱ्यावर टाके असूनही नॉर्वेने मोल्डोवावर 11-1 अशी ऐतिहासिक मात केली. सर्बियाविरुद्धच्या एकतर्फी लढतीत इंग्लंडकडून नॉनी मडुके, एझी कोंसा आणि मार्क गुही यांनी प्रत्येकी एक गोल केला.

फ्रान्सने दहा खेळाडूंनी खेळूनही एम्बाप्पेच्या गोलाच्या बळावर आणि आणखी एका निर्णायक गोलमुळे आइसलॅण्ड संघाला 2-1 असे पराभूत केले. दुसरीकडे, जोआओ कॅन्सेलोने 86 व्या मिनिटाला केलेल्या विजयी गोलामुळे पोर्तुगालने हंगेरीवर 3-2 अशी निसटती मात केली. या सामन्यात रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत विश्वचषक पात्रतेतील आपला 39 वा गोल केला आणि ग्वाटेमालाच्या कार्लोस रुइजच्या विक्रमाशी बरोबरी साधली. दरम्यान, चेहऱ्यावर टाके असतानाही हॅलंडने पहिल्याच हाफमध्ये हॅटट्रिकसह पाच गोल झळकावत नॉर्वेला मोल्डोवाविरुद्ध 11-1 असा धडाकेबाज विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.