
मुंबईसह महाराष्ट्रात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या वाहनांद्वारे पर्यावरणात कार्बन मोनॉक्साईडसारखे घातक प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन होत आहे. ते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणाही केली. त्याची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून केली जाणार होती, मात्र आज डेडलाईन ओलांडली तरी टोलमाफी देण्यात आलेली नाही.
29 एप्रिल 2025 रोजी राज्य शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले. त्या धोरणांतर्गत राज्यात महत्त्वाचे रस्ते आणि महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. 23 मे 2025 रोजी त्याबाबतचा शासन आदेशही जारी करण्यात आला, मात्र चार महिन्यांपूर्वी घेतलेला तो निर्णय अजूनही अंमलबजावणीविना केवळ कागदावरच आहे.
या मार्गांवर टोलमाफीची घोषणा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू
चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल पूर्णपणे माफ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमध्ये 50 टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली होती.