आठ वर्षे होऊनही रत्नागिरी शहराची नळपाणी योजना अपूर्ण, पावसाळ्यात तरी शहरवासियांना 24 तास पाणी द्या

आठ वर्षे होऊनही रत्नागिरी शहराची नळपाणी योजना अपूर्ण आहे. पावसाळ्यामध्ये रत्नागिरी शहरवासियांना 24 तास पाणी द्या. पानवल धरणाचे 1300 मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. पावसाळ्यात शीळ धरणात पाणी साठवून पानवल धरणाचे पाणी वापरावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलींद कीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे केली आहे.

माजी नगराध्यक्ष मिलीद कीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी दिलेल्या निवेदनात नळपाणी योजनेच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. नवीन नळपाणी योजना 2016 साली मंजूर होऊनही टेंडर आणि वर्कऑर्डर होण्यास 2017 उजाडले. आज आठ वर्षे होऊनही या नळपाणी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. नळपाणी योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा असताना नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराचे लाड केले. त्यामुळेच हा विलंब झाला आहे. या ठेकेदाराने अशाप्रकारचे काम यापुर्वी कधीच केले नव्हते. त्याकरीता खोटे दस्ताऐवज तयार करुन पात्र होण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे दाखल केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी केला आहे. या गोष्टीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच आज रत्नागिरी शहराची नळपाणी योजना निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप कीर यांनी केला आहे. नळपाणी योजनेचे 24 तास पाणी देण्याचे नियोजन केले असतानासुध्दा शहरवासियांना पाणी मिळत नाही, अशी खंत मिलींद कीर यांनी व्यक्त केली.