भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने आणखी एक धक्का दिल्याचे समोर आले आहे. भाजपचे महापालिकेतील माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी भाजपला ‘रामराम’ करत तुतारी फुंकण्याचा निर्धार केला आहे. यामुळे मोशी परिसरात भाजपला मोठा धक्का बसणार असून महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे.
भोसरी विधानसभेमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक अशी क्रीडा समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांची ओळख होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर सस्ते यांनी लांडगे यांना रामराम करत अजित गव्हाणे यांना पाठिंबा दिला आहे.
मोशी भागामध्ये सस्ते कुटुंबीयांची मोठी ताकद आहे. सस्ते कुटुंबियांकडून पाठिंबा मिळाल्यामुळे या भागात महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. लक्ष्मण सस्ते यांच्याप्रमाणेच आणखीही पदाधिकारी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
याबाबत लक्ष्मण सस्ते म्हणाले, मोशीसारखा मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेला भाग आजही मूलभूत गरजांसाठी वंचित आहे. खड्डे, रस्ते, पाणी, वीज टंचाई यावर मार्ग काढून आम्हाला चांगल्या सुविधा देणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे. अजित गव्हाणे हे करू शकतात. त्यांच्याकडे कामाची दूरदृष्टी आहे. म्हणूनच त्यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. माझ्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते आज या मतदारसंघात तुतारी फुंकण्याचे काम मोठ्या ताकदीने करणार आहेत. स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना अजित गव्हाणे यांनी शहरातील अनेक पूल, ग्रेड सेपरेटर, पाण्याच्या टाक्या, रस्ते यांचे नियोजन केले. अनेक कामे मार्गी लावताना कोणत्याही बाबतीत त्यांच्या कामावर गालबोट लागलेले नाही. सुसंस्कृत नेता म्हणून त्यांची शहरात ओळख आहे, असेही सस्ते म्हणाले.