क्रिस्टन कॅबोट यांचा घटस्फोटासाठी अर्ज, Cold Play मधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिन्याभरातच घेतला निर्णय

दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ब्रिटीश ब्रॅंड कोल्डप्लेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ॲस्ट्रोनॉमरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी बायरन आणि कंपनीच्या एचआर प्रमुख क्रिस्टन कॅबोट एकमेकांना मिठी मारताना कॅमेऱ्य़ात दिसले होते. या घटनेनंतर आता क्रिस्टन कॅबोट आणि त्यांच्या पती एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बोस्टनमध्ये 16 जुलैला COLD PLAY चा कॉन्सर्ट झाला. यामध्ये कॅमेरा अचानक बायरन आणि कॅबोट यांच्याकडे वळला. तेव्हा ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते. कॅमेरा आपल्याकडे वळल्याचे समजताच ते दोघेही दचकले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे अँडी बायरन आणि क्रिस्टन कॅबोट या दोघांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.

बायरन आणि कॅबोट यांच्या व्हिडीओमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आहे. किस कॅम प्रकरण व्हायरल झाल्याच्या एक महिन्यातच म्हणजे 13 ऑगस्ट रोजी क्रिस्टन कॅबोट यांनी पती अँड्र्यू कॅबोट यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. न्यू हॅम्पशायरमधील पोर्ट्समाउथ येथील न्यायालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.