हंडी फुटणार, लोणी लुटणार! बोल बजरंग बली की जय… आज थरथरार

मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमीचा प्रचंड उत्साह असून उद्या दहीकाल्यात आकाशाला गवसणी घालणारे थरावर थर रचून दहीहंडीतील लोणी लुटण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. मध्यरात्री कृष्णजन्म झाल्यापासूनच माखनचोरांच्या खोडय़ा सुरू होणार असून लोण्याची आणि दहीहंडीच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ स्वप्न राहिलेले दहीहंडीचे दहा थर कोण रचतात याकडे सर्वांची उत्पंठा शिगेला पोहोचली आहे.

कृष्णजन्माष्टमीनंतर साजरा होणारा दहीहंडीच्या उत्सवाला गेल्या काही वर्षांपासून प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोपाळ अनेक दिवस सराव करीत असतात. गोपाळकाल्या दिवशी रचल्या जाणाऱ्या शिस्तबद्ध मनोऱ्यांमुळे याची प्रचीती क्षणोक्षणी येत असते. अनेक मंडळे, राजकीय पक्ष आणि संस्थांकडून आयोजित होणाऱ्या या उत्सवात खऱ्या अर्थाने थरावर थर रचून एकमेकांचा आधार घेऊन उत्तुंग शिखर गाठण्याचा जणू मार्गच दाखवणार आहेत. मुंबईत सर्वाधिक प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे गोविंदांचा उत्साह वाढला आहे.

आकर्षक टी-शर्ट, सामाजिक संदेश

दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा परिधान करीत असलेले टी-शर्ट मोठे आकर्षण असते. प्रत्येक मंडळाचा एकच कलर, एकच संदेश आणि सामाजिक संदेश देणारी हे टी-शर्ट गोविंदांसह समाजासाठीही आकर्षणाचा पेंद्र असते. या वर्षी देशात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिला सुरक्षा जनजागृतीचा संदेश अग्रस्थानी असेल, अशी अपेक्षा आहे.

गाणी, डीजे, ढोलताशांचा गजर

दहीहंडी उत्सवानिमित्त अनेक मंडळे, राजकीय पक्षांकडून गोविंदांसाठी जागोजागी गोविंदांना थर रचण्यासाठी सुविधा करण्यात येणार आहेत. या ठिकाणी गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी गाणी, डीजे आणि ढोलताशांचा गजरही राहणार आहे. शिवाय गोविंदांसाठी अल्पोपाहार, पाणी आदी सुविधाही तैनात ठेवण्यात येणार आहे.

बक्षिसांची होणार लयलूट

मुंबई परिसरात मोठय़ा उत्साहात होणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये हंडी पह्डण्यासाठी ठेवलेली बक्षिसांचे मोठे आकर्षण असते. पाच- दहा हजारांपासून ते थेट लाखो रुपयांची लयलूट या उत्सवात होते. थराथरांनुसार ही बक्षिसे आयोजकांकडून गोविंदांना दिली जातात. त्यामुळे सर्वाधिक रकमेचे बक्षीस कोण पटकावतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुरक्षेला प्रथम प्राधान्य

थरावर थर रचताना अनेक वेळा थर कोसळतात. गोविदांची सुरक्षेसाठी उपाययोजना करणे महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे मंडळांकडून गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतात. सर्वात वरच्या थरावर चढणाऱ्या गोविंदासाठी ‘सेफ्टी रोप’ची व्यवस्था सर्वच आयोजकांकडून करण्यात आलेली असते. शिवाय प्रत्येक आयोजनाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, अॅम्ब्युलन्सही तैनात असतात.

जखमी गोविंदांसाठी रुग्णालये सज्ज

दहीहंडी उत्सवात दुर्दैवाने गोविंदा जखमी झाल्यास कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा औषधोपचारासह तैनात ठेवली असून विविध रुग्णालयांत शेकडो बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, परळ येथील केईएम रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील नायर आणि अंधेरी कूपर रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. गोविंदा किरकोळ जखमी झाल्यास गोविंदांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेने तीन पाळय़ांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत दोन हजार हंडय़ांसाठी चढाओढ

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यंदाची दहीहंडी असल्याने मुंबईत उत्सवाचा जोर यंदा जरा जास्तच आहे. मुंबईत जवळपास दोन हजार हंडय़ा लागणार आहेत. त्यात 500 हंडय़ा या मोठय़ा असतील. त्यामुळे दहीहंडीचा सण शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथकदेखील तयार झाले आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबईत दहीहंडीसाठी नियमित बंदोबस्ताबरोबरच छेडछाडविरोधी पथके, निर्भया पथके, बीडीडीएस, क्यूआरटी, दंगल नियंत्रण पथके अशी विविध पथके ठिकठिकाणी तैनात राहणार आहेत.  हा सण सर्वांनी जल्लोषात, पण शिस्तीत साजरा करावा. हुल्लडबाजी, नको ती घोषणाबाजी, पाण्याचे फुगे मारणे असे प्रकार करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.