गीतेचे एक उपायोजन-‘मत्स्यगंधा’

2418

नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज ऑफ आर्ट्स, नांदेड यांनी एक राष्ट्रीय चर्चासत्र भरवले होते. या चर्चासत्रात ‘संस्कृत साहित्याचा समाजावरील प्रभाव’ या विषयावर संस्कृत साहित्याचे अभ्यासक अंकित रावळ यांनी प्रस्तुत केलेला हा शोध निबंध.

………………………..

>> अंकित रावळ

वाङ्मयाचा प्रभाव समाजावर पडणे किंवा समाजाचा प्रभाव वाङ्मयावर पडणे या दोन्ही गोष्टी परस्परपूरक आहेत. वाङ्मयाचा अभ्यास, प्रचार, प्रसार, पाठांतर, पारायण या गोष्टी आपल्याऴा दिसतात, परंतु प्रत्यक्ष एखाद्या उपक्रमामध्ये त्याचे उपायोजन होणे विशेष आहे. श्रीमद्भगवदगीतेच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानामुळे तत्त्वज्ञ, संत, शास्त्रकार यांच्या सोबतच जनमानसामध्ये सुद्धा तिचे स्थान अनन्यसाधारण आहे. गीतेच्या विचारांचे प्रत्यक्ष उपायोजन या दृष्टीने ‘स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्द मानवः’ यावर आधारित स्वाध्याय- परिवाराचा मत्स्यगंधा हा प्रयोग या शोधनिबंधामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे.

पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेला स्वाध्याय- परिवार गीतेला आपले वैचारिक अधिष्ठान मानतो. भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये राहतो (सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो), सगळे भगवंताचेच अंश आहेत (ममैवांशो जीवऴोके) व त्या नात्याने सगळय़ांमध्ये दैवी-भ्रातृभाव आहे. जीवन भगवंत चालवत असल्याने कृतज्ञतेने भगवंताची पूजा करायला हवी. ती कशा प्रकारे?

कर्म केल्याशिवाय राहणे अशक्य आहे. (न हि कश्चित् क्षणमपि जातुनिष्ठय़कर्मकृत् ।) म्हणून कर्मानेच भगवंताची पूजा करावी असा विचार पांडुरंग शास्त्री यांनी गीतेच्या आधारे मांडला आहे. (यत्करोषि यदश्नासि… तत्कुरुष्व मर्दपणम् ।) व (स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।) भगवंत आपल्यामध्ये आहे ही भावना प्रयोगामुळे मनात स्थिर झाल्याने व दैवी भ्रातृभावामुळे हळूहळू व्यसनमुक्ती व तंटामुक्तीचे चित्र गावांमधे पहावयास मिळते. ही प्रयोगातून मिळणारी सामाजिक सिद्धी.

गीतेत वर्णित ‘नैष्कर्म्यसिद्धी’मिळण्य़ास टिळकांच्या मतानुसार कर्मे सोडण्याची जरूर नाही. निष्काम व परमेश्वरार्पण बुद्धीने, पुजारी भावाने प्रयोगामध्ये काम करताना हळूहळू माणसामध्ये आपली प्रत्येक कृती ही निष्काम-बुद्धीने ईश्वरार्पित करण्याची वृत्ती निर्माण व्हावी व शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार ‘यद यद कर्म करोति तत्तदखिलं शंभोस्तवाराधनम्। अशी स्थिती निर्माण व्हावी हेच या प्रयोगाचे ध्येय व खरी सिद्धी म्हणावी.

मत्स्यगंधेचे पुजारी ‘सागरपुत्र’ यांना कदाचित संस्कृत माहीत नसेल. परंतु गीतेच्या श्लोकांवर आधारित त्यांना मिळालेल्या मत्स्यगंधा या प्रयोगामुळे त्यांच्या जीवनांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाल्याचे दिसते. संस्कृत वाङ्मयाचा संस्कृतीवर व समाजावर पडलेला हा प्रभाव म्हणता येईल.

यत: प्रवृतिभूर्तानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः।।

ज्याच्यापासून सर्व भूतांची प्रवृत्ती झाला व ज्याने हे सर्व जग विस्तारिले आहे, त्याची पूजा स्वकर्माने केल्यास मनुष्याला सिद्धि प्राप्त होते.

लोकमान्य टिळक गीतारहस्यामध्ये पूजा (स्वधर्माने प्राप्त) कर्मांनी (केवळ वाणीने अगर पुष्पांनी नव्हे) असे विशेषत्वाने सांगतात. आजच्या काळामध्ये पांडुरंगशास्त्री यांनी स्वकर्माचा अर्थ प्रयोगांच्या संदर्भामध्ये आपली कर्मकुशलता असा केला आहे. ती कर्मकुशलता निष्काम बुद्धीने भगवंताच्या चरणी अर्पण करणे ही त्याची पूजा.

मच्छीमारांचे स्वकर्म म्हणजे मासेमारी करणे. म्हणून त्यांना मत्स्यगंधा हा प्रयोग दिला गेला. ज्यामध्ये गावातले स्वाध्यायी मच्छीमार एक भगवंताच्या मालकीची म्हणून नौका बनवतात. तिचे नाव मत्स्यगंधा. पाळीपाळीने पुजारी म्हणून पुरुष मासे मारायला व स्त्रीया मासे विक्री करायला जातात. ‘मत्स्यगंधा’ हे पूजेचे स्थान असल्याने तिला Floating Temple (तरळणारे मंदिर) सुद्धा म्हणतात. यातून निर्माण झालेले वित्त हे कुणाच्याच मालकीचे नसल्यामुळे त्याला ‘अपौरुषय लक्ष्मी’ असे म्हणतात व ते गावातील गरजू लोकांना गुप्तपणे व दैवी भ्रातृभावाच्या नात्याने दिले जाते. ‘स्वकर्मणा पूर्वोक्तेन प्रतिवर्ण तमीश्वरमभ्यर्च्य पूजयित्वा’- मासेमारी हे त्यांचे स्वभावनियत कर्म पापयुक्त आहे अशी शंका येते. परंतु गीतेतच याचे उत्तर स्पष्ट आहे. स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्। स्वभावतः नियमित केलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या मनुष्याला पाप लागत नाही. शंकराचार्य सुद्धा भाष्यामध्ये सांगतात की, ज्याप्रमाणे विषामधल्या किड्याला विष बाधक ठरत नाही, तसं स्वभावनियत कर्म करण्याला (जरी सदोष, वाटले) तरी त्याचे पाप लागत नाही.जन्माने मिळणारे स्वकर्म सदोष असले तरी सोडू नये.

सहज कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् । टिळक सांगतात की स्वकर्म अश्लाघ्य, अप्रिय व अवघड वाटले तरीही सोडू नये. म्हणूनच पांडुरंगशास्त्री सुद्धा या कामाला ‘पापाचा नाही तर बापाचा धंदा’ असे म्हणतात. नाहीतरी सर्व उद्योग हे दोषाने व्यापलेलेच असतात. (धूर व अग्निप्रमाणे)

अपौरुषेय लक्ष्मीमुळे गावाचा होणारा आर्थिक विकास व गरीबांना होणारी मदत ही या प्रयोगातून मिळणारी संपन्नतेची सिद्धी जी पांडुरंगशास्त्री यांच्या मते या प्रयोगाचे लक्ष्य नसून ‘By-product’ (उपनिर्मिती) आहे.

सन्दर्भग्रन्थ

१) श्रीमद्भगवद्गीता रहस्य- बाळ गंगाधर टिळक, प्रकाशक- टिळक बंधू, २२वी आवृत्ती, २००६. (पान क्रमांक- ५३८)
२) श्रीमच्छंकराचार्यविरचितं श्रीमद्भगवद्गीताभाष्यम्, प्रकाशक- मोतीलाल बनारसीदास, आवृत्ती- १९८१.
या कृतिभक्तीच्या बैठकीवर श्रीमद्भगवद्गीतेच्या पुढील श्ऴोकावर आधारित अनेक प्रयोग (योगेश्वर कृषि, मत्स्य हीरामंदिर इ.) पांडुरंगशास्त्री यांनी सुचवले.
३) श्रीमद्भगवद्गीता- १८:४७
४) शांकरभाष्य- ‘यथा विषतातस्य कृमेर्विषं न दोषकरं, तथा स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं पापम्।’

(वरील शोध निबंधात अंकित रावळ यांनी मांडलेली अभ्यास पूर्ण मतं ही त्यांची स्वत:ची मतंं आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या