दृश्यमानता आणि उंची, या दोन कारणांमुळे अजित पवारांच्या विमानाला अपघात; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध कारणांचा विचार केला जात असल्याचे विमानतज्ज्ञ दिप्तेश चौधरी यांनी सांगितले. गुजरातमधील अहमदाबाद येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अपघातामागील संभाव्य कारणांवर भाष्य केले.

चौधरी यांनी सांगितले की, अपघातामागे अनेक कारणे असू शकतात. उपलब्ध माहितीनुसार त्या वेळी दृश्यमानता कमी होती. पुणे परिसरातील दृश्यमानता सुमारे 2500 मीटर होती, तर बारामती परिसरात ती आणखी कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी दृश्यमानता हे एक संभाव्य कारण असू शकते.

तसेच विमान अंतिम टप्प्यात धावपट्टीकडे येत असताना अपेक्षेपेक्षा थोड्या कमी उंचीवर असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अंतिम टप्प्यात विमान धावपट्टीशी योग्य प्रकारे समांतर न बसल्याने (अलाइनमेंटमध्ये अडचण) अपघात घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, अपघातामागील नेमके कारण सध्या सांगता येणार नाही, कारण हे प्रकरण सविस्तर चौकशीचा विषय असून तपासानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल, असेही चौधरी यांनी नमूद केले.