वंचित समाजाचा आवाज सरकारने ऐकलाच पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजावून सांगा, असा जाब भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
वडिगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणास बसले आहेत. आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या दोघांची भेट घेतली.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. शासनाची भूमिका मायबापाची असली पाहिजे. सर्व वर्गांना, सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक, समान न्याय सरकारकडून मिळावा अशी अपेक्षा असते.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही, पण चुकीच्या पद्धतीने सटीर्फिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोघांचे उपोषण सोडविण्यासाठी यावे असेही त्या म्हणाल्या.