
राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या पवईतील ‘एमसीएमसीआर’ या संस्थेला समन्वय (नोडल एजन्सी) म्हणून मान्यता दिली असून शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसेच महापालिकांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर)ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. एमसीएमसीआरकडून महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मनुष्यबळास कौशल्य आणि क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते.
कंत्राटी तत्त्वावरील भरती प्रक्रियेअंतर्गत अध्यापन, प्रशासकीय, कार्यालयीन, तांत्रिक तसेच चतुर्थ श्रेणी अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठीची मुदत आता 13 मेऐवजी आता 20 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकूण 15 संवर्ग मिळून 20 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. उमेदवारांना विविध संवर्गासाठी https://mcmcr.mcgm.gov.in/careers.php या लिंकवर अर्ज करता येणार आहे.