मंत्रालयात आता चेहरा दाखवून हजेरी, बायोमेट्रिक्सवर बोट ठेवण्याची गरज नाही

मस्टरवर सही करून हजेरी लावण्याची पद्धती कालबाह्य होऊन मागील काळात मंत्रालयात बायोमेट्रिक्स हजेरी सुरू झाली. पण कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन बायोमेट्रिक्स पद्धती सध्या बंद केली आहे. पण आता मंत्रालयात फेस मॅट्रिक्स म्हणजे चेहरा पडताळणी हजेरी सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात येत आहे.

मंत्रालयात गेल्या काही वर्षांपासून बायोमेट्रिक्स हजेरी सुरू झाली आहे, पण कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी बामोमेट्रिक्स हजेरी बंद करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग कमी होताच पुन्हा बायोमेट्रिक्स पद्धत सुरू झाली होती. पण आता तिसरी लाट आल्यामुळे पुन्हा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. आता भविष्यातही कोरोनाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हजेरीसाठी फेस मॅट्रिक्स पद्धत सुरू करण्याची योजना आखली आहे. मात्र सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल. यासंदर्भात मंत्रालयात आज सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फेस मॅट्रिक्स हजेरीबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली.

यावेळी बोलताना सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थितीवर स्थगिती आणली आहे. त्याऐवजी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या चेहरा पडताळणी हजेरी प्रणाली (फेस मॅट्रिक्स)चा वापर केल्यास कर्मचाऱ्यांचा वेळही वाचेल. प्रायोगिक तत्त्वावर अशा काही मशीनचा वापर करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात मंत्रालयात केवळ चेहऱ्याच्या आधारावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी लागणार आहे. या बैठकीला माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विवेक भिमनवार, उपसचिव ज. जी. वळवी, माहिती- तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव लक्ष्मण सावंत उपस्थित होते.