फेसबुकवेड्या पत्नीचे फॉलोअर्स वाढले, नवऱ्याने केली हत्या

2604

एका महिलेला फेसबुकचं प्रचंड वेड होतं. ती सातत्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ फेसबुक प्रोफाईलवर शेअर करत होती. सतत पोस्ट पडत असल्याने तिच्या फेसबुकवरील फॉलोअर्सची संख्या वाढत चालली होती. तिचे 6 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले होते. या महिलेचं फेसबुक आणि मोबाईलचं वेड हे व्यसनात बदललं होतं. आणि हे व्यसन तिच्या वैवाहिक आयुष्यात संकट निर्माण करणारं ठरलं आणि तिच्यासाठी जीवघेणंही.

राजस्थानमधील जयपूरमध्ये आमेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याबाबत जेव्हा तपास करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या संशयाची सुई ही महिलेच्या नवऱ्याकडे वळली. पोलिसांनी जेव्हा अयाज अहमद या तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा त्याने आपल्या बायकोची हत्या केल्याचं कबूल केलं.

जयपूरच्या गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कुमार गुप्ता यांनी या हत्येसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. गुप्ता यांनी सांगितले की राजस्थान-दिल्ली महामार्गावर एका मंदिराशेजारी या महिलेचा मृतदेह सापडला होता. तिच्या मृतदेहाशेजारी तिची दुचारी आणि हेल्मेटही सापडलं होतं. ज्यावरून तिची ओळख पटवण्यात आली. या महिलेचं नाव नैना उर्फ रेश्मा मंगलानी असल्याचं पोलिसांनी कळालं.

नैना आणि अयाजची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्म वेगवेगळे असल्याने नैनाच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. यामुळे दोघांनी पळून जाऊन हिंदू तसेस मुसलमान पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर दोघांमध्ये काही दिवसांतच खटके उडायला लागले. भांडण इतकं वाढलं की दोघे वेगळे राहायला लागले. नैनाने अयाजला घटस्फोट घेण्याचाही इशारा दिला होता. या दोघांना एक मूल असून अयाजला नैनाचे फेसबुक प्रोफाईल पाहून तिच्या चारित्र्यावर संशय यायला लागला होता.

अयाजने नैनाला मतभेद दूर करण्याच्या नावाखाली निर्जनस्थळी बोलावले होते. नैना तिथे गेल्यानंतर दोघांनी भरपूर दारू प्यायली. नैना झिंगल्याचं पाहिल्यानंतर अयाजने तिचा गळा आवळून खून केला. तिची ओळख पटू नये यासाठी त्याने तिचा चेहरा दगडाने ठेचला मात्र पोलिसांच्या उत्तम तपासामुळे अयाज अडकलाच आणि अखेर त्याची रवानगी तुरुंगात झाली.

आपली प्रतिक्रिया द्या