तोतया पोलिसांचा बुरखा आता एका झटक्यात फाटणार, रायगडातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे डिजी लॉकरवर ओळखपत्र प्रमाणित

मी पोलीस अधिकारी आहे.. तुला आता अटकच करतो.. अशी बतावणी करून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांचा आता एका झटक्यात बुरखा फाटणार आहे. यासाठी रायगड पोलीस विभागाने जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डिजीलॉकरवर ओळखपत्र प्रमाणित केले आहे. यामुळे एखाद्या अधिकाऱ्याने ओळखपत्र दाखवले तर तत्काळ नागरिकांना डिजीलॉकरवर जाऊन त्याची पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची लूट थांबणार आहे.

बनावट ओळखपत्र तयार करून नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये देशात वाढ होत आहे. या फसवेगिरीला आळा घालण्यासाठी रायगड पोलीस विभागाने डिजिटल पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डिजीलॉकर प्रणालीवर प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे. यामुळे पोलिसांमार्फत दाखवण्यात आलेले ओळखपत्र खरे की खोटे याची छाननी नागरिक करू शकणार आहेत.

देशात पहिला जिल्हा
देशात डिजीलॉकरचा वापर करून ओळखपत्र प्रमाणित करणारा रायगड हा पहिला जिल्हा ठरला आहे. दरम्यान तोतया पोलिसांना पायबंद करण्याकरिता रायगड पोलीस विभागामार्फत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या ओळखपत्रांचे प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे पोलिसांमार्फत दाखवण्यात आलेले ओळखपत्र खरे की खोटे याची छाननी डिजीलॉकरद्वारे करता येणे शक्य आहे. यामुळे नागरिकांना स्वतःचा बचाव करता येणार आहे.