पाटोदा परिसरात अतिवृष्टी, मांजरा नदीला महापूर; फक्राबाद गावचा संपर्क तुटला

पाटोदा परिसरात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला महापूर आला आहे. या पुरामुळे बीड आणि धाराशीव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फक्राबादच्या पुलावरुन पाणी गेल्याने रात्रीपासून गावचा संपर्कच तुटला आहे. शेत शिवारात पुराचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

फक्राबाद गाव हे मांजरा नदीपात्राजवळच वसल्याने या गावाला जाण्यासाठी एकच रस्ता आहे. मांजरा नदीला पूर आला की पावसाळ्यात या गावचा संपर्कच तुटतो. पावसाळयात जनावरे वाहून जाण्याचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. मांजरा नदीवरील अरुंद पुलाचा फटका या गावकऱ्यांना बसतो व गावचा संपर्कच तुटतो. यामुळे आजारी रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणे दुरापस्त होते.

गावकरी प्रत्येक वर्षी प्रशासनाकडे तक्रारी करतात. परंतु याचा काहीच उपयोग होत नाही. धाराशीव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने प्रशासन व राज्यकर्त्यासाठी हे गाव दुर्लक्षीत असल्याने पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागतो.