वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा सरकारच्या विरोधात आक्रोश उफाळून आला आहे. या वसाहतीत वर्षानुवर्षे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहतीमध्ये अल्प दरात कायमस्वरूपी घरे मिळण्याच्या मागणीसाठी वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकास योजनेत माफक दरात मालकी हक्काची घरे मिळण्यासाठी या वसाहतीतील अधिकारी व कर्मचारी गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहेत. सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून शासनाकडे मागणी केल्यास कर्मचाऱ्यांना माफक दरात मालकी हक्काच्या घरांच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल असे आश्वासन सरकारने विधान मंडळातही दिले होते.
सरकारच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी ‘नियोजित शासकीय वसाहत रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था-संघीय संस्था’ स्थापन करून या संस्थेमार्फत माफक दरातील मालकी हक्काच्या घरांच्या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे बैठका होऊनही निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.