जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन, संगीत विश्वात शोककळा

जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. इंग्रजी वृत्तपत्रांनी झाकीर हुसेन यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारानं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. झाकीर हुसेन हे हृदयविकाराच्या समस्येने त्रस्त होते. त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू आहे.

झाकीर हुसेन यांचा जीवनप्रवास

दरम्यान, झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. झाकीर हुसेन यांचे वडील अल्ला राखा हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. तबला वादनाचे हे कौशल्य झाकीर यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते. लहानपणापासूनच ते वाद्य वाजवायला शिकले. ते तीन वर्षांचे असतानाच पखावाज वाजवायला शिकले. ही कला त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवली होती. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला. यानंतर त्यांनी 1973 मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लॉन्च केला.

झाकीर यांनी लहान वयातच तबल्यावर आपली पकड मजबूत केली होती. पुढे अनेक अडचणींवर मात करून त्यांनी जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. जेव्हा ते तबला वाजवायचे तेव्हा प्रेक्षक आपलं भान हरपून ऐकायचे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जडणघडणीतही त्यांचं मोठं योगदान आहे.

वर्ष 1999 मध्ये त्यांना ‘यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्स’द्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली. त्यानंतर उस्ताद झाकीर हुसेन यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली. झाकीर हुसैन यांना 1988 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यानंतर वर्ष 2009 मध्ये त्यांना सर्वात प्रतिष्ठित संगीत पुरस्कार ‘ग्रॅमी पुरस्कारा’ने देखील सन्मानाची करण्यात आलं होतं. झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र ते त्यांच्या संगीतातून चाहत्यांच्या मनात नेहमीच जिवंत राहतील.