फिरस्ती – छायाप्रकाशाच्या भन्नाट फ्रेम्स

>> प्रांजल वाघ

मोबाईल फोटोग्राफी, ड्रोन आणि मिररलेस कॅमेऱ्यांचे नवे युग सुरू झाले आहे. पण झपाट्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि फोटोग्राफीची बदलती व्याख्या यात काही गोष्टी मात्र निश्चल, अढळ आणि शाश्वत आहेत आणि त्या म्हणजे – फोटोग्राफीची मूलभूत तत्त्वे आणि फ्रेमिंगचं ज्ञान!

19 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील प्रत्येक छायाचित्रकाराला ‘एका छायाचित्राद्वारे आपले जग, अवघ्या जगासमोर मांडता यावे’ हा या दिवसामागे असलेला उद्देश. आपली छायाचित्रे जगासोबत शेअर करण्यासाठी तसे खास संकेतस्थळही निर्माण करण्यात आले आहेत.

पूर्वीच्या मानाने आता छायाचित्र काढणे हे खूपच सोपे झाले आहे. पूर्वीचे रोलवाले कॅमेरे आता इतिहासजमा झालेत. डीजीकॅम आणि डीएसएलआरचे युगदेखील आता संपत आले आहे. मोबाईल फोटोग्राफी, ड्रोन आणि मिररलेस कॅमेऱ्यांचे नवे युग सुरू आहे. पण झपाट्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि फोटोग्राफीची बदलती व्याख्या यात काही गोष्टी मात्र निश्चल, अढळ आणि शाश्वत आहेत आणि त्या म्हणजे – फोटोग्राफीची मूलभूत तत्त्वे आणि फ्रेमिंगचं ज्ञान! वन्यजीव छायाचित्रणाच्या बाबतीत आणखी एका मुद्द्याची भर पडते ती म्हणजे तुम्ही ज्या प्राण्याचे छायाचित्र काढता त्याचे वर्तन आणि सवयी.

जेव्हा तुम्ही ऐतिहासिक वास्तू, मंदिर, किल्ले यांचे छायाचित्रण करता तेव्हा ती वास्तू तुम्ही कॅमेऱ्यात कैद करताना तुमचा दृष्टिकोन खूप प्रभावशाली ठरू शकतो. 2020 सालच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही लोहगड किल्ल्याच्या जवळ असलेल्या भाजे लेणी पाहायला गेलो होतो. नुकताच घेतलेला निकॉन डी750 कॅमेरा आणि Tamronची 15-30 वाईड अँगल लेन्स सोबत घेऊन आम्ही लेण्यांचे फोटो काढायला लागलो. चैत्यगृहाच्या छतावर असलेले प्राचीन, अर्धवर्तुळाकार लाकडी वासे नजरेत भरले आणि मनात एक फ्रेम तयार झाली. स्तूपाच्या मागे जाऊन, खाली जमिनीवर बसून एक फोटो काढला. वाईड अँगल लेन्स, फुल फ्रेम कॅमेरा, प्रकाशाचा आणि छायेचा खेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वास्तूचा फोटो काढताना आलेला वेगळा दृष्टिकोन याने फोटोला अधिक प्रभावी बनवलं. ‘लोन्ली प्लॅनेट’ मासिकाच्या इन्स्टाग्राम पेजवर तो प्रकाशित करण्यात आला, तो हा फोटो!

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील अनेक किल्ले आजवर पहिले आणि त्यांचे छायाचित्रण करताना देखील याच गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. शिल्पं, वास्तू यांचे छायाचित्रण करताना काही प्रमाणात तुमची लेन्स कोणती आहे हे महत्त्वाचे असते. तिथे वाईड अँगल लेन्स सोबत असेल तर काही औरच मजा येते. आंध्र प्रदेशमध्ये असलेला, मुरारीराव घोरपडय़ांचा गुत्ती किल्ला अथवा रावदुर्ग हा कॅमेऱ्यात कैद करताना काही भन्नाट फ्रेम्स मिळाल्या होत्या. किल्ल्याच्या माचीवर घोडय़ांच्या पागा आहेत. त्यांच्या गवाक्षातून ही आगळीवेगळी फ्रेम मला मिळाली. तसंच कर्नाटकातील सुडी गावात असलेल्या जोडू कलसा गुडी (जुळ्या शिखरांचे मंदिर) आणि जवळच असलेल्या नागकुंड पुष्करणीच्या काही आगळ्यावेगळ्या फ्रेम मिळाल्या. मावळतीकडे झुकत चाललेला सूर्य, त्याचा सौम्य प्रकाश, सावल्यांचा खेळ आणि तेथील दगडांच्या रंगछटा यांनी फोटोंमध्ये एक वेगळीच जादू आणली. (सुडी)

वन्यजीवांचे छायाचित्रण करताना मात्र छायाचित्रणातील मूलभूत तत्त्वांचा विचार करावा लागतोच, पण आपण जो प्राणी, पक्षी अथवा अन्य जीव यांचे छायाचित्र काढत आहोत त्याच्या सवयी आपल्याला ठाऊक असल्या पाहिजेत. भारतात खंड्या पक्षाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील सर्वात रंगीबेरंगी खंड्या पक्षी म्हणजे ‘तिबोटी’ खंड्या! इंग्रजीमध्ये याला “Oriental Dwarf Kingfisher“ म्हणतात. याची एक खास सवय आहे. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीच्या भिंतीत भुयार करून हा पक्षी तिथे अंडी घालतो आणि पिल्लं जन्माला आली की आई-बाबा लगेच त्यांच्यासाठी जेवण आणायला घरट्याबाहेर पडतात. सरडे, किडे पकडून हे दोघे दिवसभर त्या पिल्लांना खाऊ घालत असतात. पण शिकार तोंडात घेऊन आल्यावर हे पक्षी थेट घरटय़ात शिरत नाहीत. ते आधी एके ठिकाणी बसून कानोसा घेतात. कुणी predator आसपास नाही याची खात्री करून घेतल्यावरच भुर्रकन घरट्यात प्रवेश करतात. छायाचित्रकार म्हणून तुम्हाला जर त्यांची ही सवय ठाऊक असेल तर तुम्ही त्यांचा फोटो नीट काढू शकता. जसा हा फोटो काढला आहे!

छायाचित्रण या कलेत तसे काहीच चूक किंवा बरोबर नसते. मूलभूत तत्त्वे आत्मसात केली की आपल्या कल्पनेचे वारू चौफेर उधळू द्या. कॅमेरा हवा तसा हाताळा. चुकलात तरी हरकत नाही. ती चूक दुरुस्त करून सुधारणा करा. तुमची छायाचित्रणाची कला अशीच विकसित होईल.
[email protected]