एकाच लायब्ररीचे दोन तासांत भाजपच्या दोन वेगवेगळ्या मंत्र्यांकडून उद्घाटन! अंतर्गत वाद समोर

लायब्ररीचे श्रेय घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांमधील चढाओढीची एक घटना समोर आली आहे. फरिदाबादमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन करताना आला. यावेळी एकाच दिवशी दोन वेळा या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मंत्र्यांनी फित कापून उद्घाटन केले. या घटनेने तेथील राजकारणात खळबळ उडाली असून भाजपच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

भाजपचे राष्ट्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार सुरेंद्र नगर रविवारी सकाळी फरिदाबाद येथे पोहोचले. त्यांच्यासोबत हरयाणा सरकारचे कॅबिनेट मंत्री विपूल गोयल आणि मंत्री राजेश नागर होते. या तिघांनी सेक्टर 12 मधील टाउन पार्कमध्ये आयोजित अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतिप्रीत्यर्थ HSIIDC ने बांधलेले ग्रंथालयाच्या उद्धाटन सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर तिन्ही नेत्यांनी रिबन कापून ग्रंथालयाचे उद्घाटन केले. फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाची अधिकृतपणे सांगता झाली.

दरम्यान, या उद्घाटनाच्या अडीच तासांनी केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर त्यांच्या समर्थकांसह आणि आमदारांसह टाउन पार्क येथे पोहोचले. गुर्जर यांच्या आगमनापूर्वी ग्रंथालय परिसर पुन्हा तयार करण्यात आला. एक नवीन रिबन लावण्यात आली. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी पुन्हा रिबन कापून ग्रंथालयाचे उद्घाटन केले. हे दृश्य पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. एकाच वेळी एकाच पक्षाच्या दोन नेत्यांनी या ग्रंथालयाचे उद्घाटन केल्यामुळे सोशल मीडियावरून पक्षावर टीका केली जात आहे.