
सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर
वीजेची तार अंगावर पडल्याने संभाजीपूर येथील शेतकरी आण्णासाहेब सुतार (६६) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आण्णासाहेब यांच्या मृत्यूला वीज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मयताचे नातेवाई व पंचाळ समाजाच्या नेत्यांनी केला. या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. तब्बल ९ तासांनी संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुतार यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता आण्णासाहेब त्यांच्या शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेले असता स्पार्किंग होऊन विजेची तार अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून शेतातील वायर लोंबकळत आहे, विद्युत डांब वाकलेले आहेत, याबाबत फोन व लेखी तक्रार करुनही कोणतीच कारवाई झाली नसल्याने विद्युत मंडळाचे अधिकारीच जबाबदार जबाबदार असून, संबधितांवर गुन्हे दाखल न केल्यास आणि त्यांच्या मुलाला वीज मंडळात नोकरी द्यावी अन्यथा मृतदेह विद्युत मंडळाच्या दारात ठेवण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली.
अखेर जयसिंगपूरचे उपकार्यकारी अभियंता व्ही. के. माने, सहाय्यक अभियंता अन्सार मुल्ला, वायरमन प्रशांत रजपूत, नितीन आरगे, मेसर्स कोलटेक्स एंटरप्रायजेसचे ठेकेदार इम्रान मुल्ला यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झााल्याचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांनी मान्य करुन संबंधितांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सुतार यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये आण्णासाहेब यांचा मुलगा अविनाश याने फिर्याद दाखल केली आहे.



























































