सामना ऑनलाईन । धुळे
यंदाच्या खरीप हंगामाला अजून म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. परंतु निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीने धुळे तालुक्यातील लोणखेडी येथील 52 वर्षीय शेतकरी भरत जिभाऊ पाटील यांनी स्वतःवर विष प्रयोग केला आणि जीवनयात्रा संपविली. भरत पाटील यांनी गेल्या आठवडय़ात कपाशीचे बियाणे रोपले होते, परंतु हे बियाणे अंकुरले नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भरत पाटलांनी शेतात कीटकनाशक प्राशन केले.
कपाशीची लागवड करण्यासाठी भरत पाटील यांनी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून पन्नास हजारांचे कर्ज घेतले होते. कपाशीचे बियाणे रोपले, पण पाऊस आला नाही. प्रचंड उकाडा आणि ऊन यामुळे बियाणे अंकुरले नाही. त्यामुळे शेतकरी पाटील अधिकच अस्वस्थ झाले. असलेले कर्ज फेडायचे कसे? या प्रश्नामुळे ते अस्वस्थ होते. अशातच त्यांनी शुक्रवारी सकाळी कपाशीच्या शेतावर येऊन कीटकनाशक प्राशन केले.


























































