कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

593

नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील भुलेवाडी येथील शेतकरी सहादेव दिवटे ( वय 55) यांनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता बिटोली शिवारात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. काही वर्षांपूर्वी सहादेव यांची पत्नीचा हृदयरोगाने मृत्यू झाला होता. त्यांच्या आजारापणामुळे सहादेव यांचे लाखो रुपये खर्च झाले होते. त्यांना चार मुली असून थोरलीचे 30 एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते.

बिटोली शिवारात ते ठेक्यावर शेती करत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते शेतात गेले. मात्र, घरी परतले नाही. मुली शेतात गेल्या असता त्यांना ते गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. पुढील तपास पारशिवनीचे ठाणेदार विलास चव्हाण करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या