शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा; आम्हाला आमच्या जमिनी हव्यात, महामार्ग नको!

आम्हाला आमच्या जमिनी हव्यात, शक्तिपीठ महामार्ग नको, अशी मागणी करत 12 जिह्यांतील शेकडो शेतकऱ्यांनी आज आझाद मैदानात मोर्चा काढत सरकारला सणसणीत इशारा दिला. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू पण जमिनी देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, 12 जिह्यांमध्ये मंत्र्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीने दिली. विधान परिषदेतही शक्तिपीठ महामार्गावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत फेरविचार करण्याची मागणी केली.

राज्यातील 12 जिह्यांतील शेतकऱ्यांच्या कसदार, बागायती जमिनी घेऊन त्यावर शक्तिपीठ महामार्ग बांधणाऱया सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज आझाद मैदानावर शेकडो शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. मोर्चाला आमदार पैलास पाटील, प्रवीण स्वामी, प्रकाश रेड्डी, कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, बयाजी शेळके, राम करे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या मोर्चाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर याप्रकरणी विधान परिषदेत विरोधी पक्षांच्या वतीने स्थगन प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, पैलास पाटील, सचिन अहिर, प्रवीण स्वामी, राजू नवघरे, राजू शेट्टी, दिलीप सोपल आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त होतील

 विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शक्तिपीठ मार्गाला विरोध म्हणून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषद सभागृहात उपस्थित केला. मोर्चेकऱ्यांची भेट घेऊनही त्यांनी संवाद साधला. लोकभावनेविरोधातील विकास जबरदस्तीने करणे अयोग्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली.