जमीनमोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी रोखले

जैनापूर (ता. शिरोळ) येथे राष्ट्रीय प्राधिकरण विभागामार्फत मोजणीच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. मात्र, जैनापूर येथील शेतकरी, खातेदारांनी मोजणी होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्याचबरोबर मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱयांना ग्रामपंचायत कार्यालयात रोखले. अखेर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी शेतकऱयांची आक्रमक भूमिका पाहून मोजणी न करण्याचे आवाहन केल्यानंतर हे पथक माघारी परतले.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग चोकाक ते उदगाव-अंकली मार्गातील शेतकऱयांना चौपट भरपाई व जुन्या बायपास महामार्गावरूनच महामार्ग झाला पाहिजे, अशी मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत मोजणी करू देणार नाही, अशी भूमिका जैनापूर येथील शेतकऱयांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाचे मोजणी अधिकारी तसेच प्राधिकरण विभागाचे अजित महात्मे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱयांनी ठिय्या आंदोलन करून विरोध दर्शवला होता.

शेतकऱयांनी मोजणी न करण्याची विनंती केली. मात्र, मोजणीच्या ठिकाणी जाऊ, अशी भूमिका प्राधिकरण विभागाची होती. मात्र, आम्ही कोणीही येणार नाही आणि मोजणीही करू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी घेतली. जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर आक्रमक शेतकऱयांनी मोजणीला विरोध केल्यानंतर पंचनामा करून पथक माघारी परतले.

यावेळी सरपंच संगीता कांबळे, माजी सरपंच सन्मती पाटील, मिलिंद मगदूम, प्रकाश पाटील, निळकंठ राजमाने, अनिल पाटील, रावसाहेब कांबळे, श्रमिक मुक्ती दलाचे नजीर चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.