भाजप आमदार दिलीप बोरसे यांना शेतकऱ्यांचा घेराव; नारपार प्रकल्पाचा गिरणा डावा कालवा अस्तरीकरण, विस्तारीकरण मुद्दा पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सटाणा-मालेगाव रस्त्यावर आज नारपार प्रकल्पाच्या मुद्दय़ावरून शेतकऱयांनी आक्रमक भूमिका घेत बागलाणचे भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घातला. गारपीटग्रस्त शेतकऱयांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बोरसे आले असता त्यांचा ताफा अडवण्यात आला. गिरणा डावा कालवा अस्तरीकरण व विस्तारीकरणाच्या कामास विरोध दर्शवत शेतकऱयांनी नारपार प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार बोरसे यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. शेतकऱयांवर अन्याय होणार नाही, ही पक्षाची आणि आमची ठाम भूमिका आहे असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, शेतकऱयांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जर गिरणा डाव्या कालव्याचे विस्तारीकरण आणि अस्तारीकरण पुढे नेले, तर येत्या काळात मोठय़ा प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱयांच्या वतीने देण्यात आला. या घटनेमुळे नारपार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त  केली जात आहे. मुळातच गिरणा डावा कालव्याच्या पाण्यावर आधी शेतकऱयांचा हक्क आहे.

या कालव्याचे अस्तरीकरण व विस्तारीकरण केले तर या भागातील शेती व्यवसाय संकटात येऊन शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱयांमध्ये मोठी नाराजी असून या प्रश्नाबद्दल लखमापूर, ब्राह्मणगाव, शेमळी, आराई, यशवंतनगर येथील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असून ब्राह्मणगाव येथे शेतकऱयांनी बैठक बोलावली आहे, या प्रश्नाचे पडसाद येणाऱया जिल्हा परिषद, पंचायत सिटी समितीच्या निवडणुकीवर दिसतील. याबाबत शेतकरी मोठय़ा आंदोलनाच्या तयारीत आहेत.