छोटा शकीलच्या हस्तकाचा पाकिस्तानला ताबा दिला, हिंदुस्थानला मोठा हादरा

24

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानला हवा असलेल्या एका गुंडाचा ताबा पाकिस्तानला दिल्याने हिंदुस्थानी तपास यंत्रणांना पुन्हा एकदा चिंतेत टाकलं आहे. यापूर्वी मलेशियानेही झाकीर नाईकचा ताबा देण्यास नकार दिला होता. फारूख देवडीवाला असं या गुंडाचं नाव असून तो छोटा शकीलचा जवळचा मानाल जातो. संयुक्त अरब अमिरातीने देवडीवालाचा ताबा मागूनही हिंदुस्थानला न देता पाकिस्तानला दिला आहे.

देवडीवाला हा आता इंडीयन मुजाहीदीनचा दहशतवादी बनला असून  त्याच्यावर दोन हिंदुस्थानी नागरिकांना पाकिस्तानात शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. त्याच्याविरूद्ध हिंदुस्थानने पूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. असं असतानाही पाकिस्तानला त्याचा ताबा देण्यात आल्याने पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत.

या सगळ्या घडामोडींचं वृत्त देणाऱ्या मुंबई मिरर या वृत्तपत्रात म्हटलंय की देवडीवाला याच्याकडे आयएसआय, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि दाऊदची गँग याबाबत भरपूर माहिती आहे. त्यामुळे देवडीवालाला काहीही करून हिंदुस्थानच्या हातात पडू द्यायचं नाही यासाठी आधीपासून हालचाली सुरू होत्या.

देवडीवाला याने २००२ साली गोध्रा दंगलीनंतर सूरतमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी २ किलो स्फोटकं आणली होती. मात्र पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने त्याचा कट फसला होता. त्यानंतर त्याने फैजल मिर्झा आणि अल्लारखां मन्सुरी या दोघांना पाकिस्तानात शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी पाठवलं होतं. या दोघांनाही महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील या दोन गुन्ह्यांसाठी देवडीवाला याचा ताबा मिळवण्यासाठी हिंदुस्थानतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत.गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक के.के.पटेल हे देवडीवालाचा ताबा मिळावा यासाठी स्वत: दुबईला गेले होते. मात्र पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीत आधीच धाव घेत देवडीवालाचा ताबा घेऊन टाकला होता.

आपली प्रतिक्रिया द्या