फर्रुखाबादमध्ये विमान दुर्घटना टळली, धावपट्टी सोडून विमान झुडपात घुसले

उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात विमान दुर्घटना घडली आहे. एक खासगी विमान टेकऑफ दरम्यान धावपट्टीवरुन घसरले आणि झुडपात आदळले. ही घटना आज 9 ऑक्टोबर रोजी फर्रुखाबादमधील नंदन एअरस्ट्रिपवर घडली. ही एक छोटी एअरस्ट्रिप आहे जी प्रामुख्याने खाजगी आणि प्रशिक्षण उड्डाणांसाठी वापरली जाते. या अपघातात विमानाचे किरकोळ नुकसान झाले, परंतु पायलट आणि प्रवासी दोघेही सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

वृत्तानुसार, हे विमान जेट सर्व्हिस एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​होते, ज्याचा नोंदणी क्रमांक VT-DEZ होता. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हे विमान उड्डाणाच्या तयारीत होते तेव्हा त्याचे नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून झुडुपात अडकले. अपघाताच्या वेळी, एक पायलट आणि एका बिअर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विमानात होते, जे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले होते.

विमान फरुखाबादच्या नंदन विमानपट्टीवरुन टेकऑफसाठी तयार होते. ही विमानपट्टी जवळपास 1000 मीटर लांब आणि घनदाट जंगलात आहे. पायलटने रनवेवर स्पीड वाढवला, मात्र जसे विमानाने उड्डाण करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी विमानाची एक बाजू खाली झुकली आणि विमान रनवेवरुन घसरले. जवळपास 50-60 मीटर दूर झुडपात घुसले.

एका वॉचमेनने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत विमान रनवेवरच घसरल्याचे स्पष्ट होते. ते आकाशात क्रॅश झाले नाही. लोकल पोलीस आणि विमानतळ प्रशासनाने 5 मिनीटात घटनास्थळी पोहोचून क्रूला सुरक्षित बाहेर काढले. कोणतीही आग लागलेली नाही, मात्र विमानाला प्रचंड नुकसान झाले. डीजीसीए आणि लोकल पोलीसांच्या माहितीनुसार, रनवेवर पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटले.