‘फास्टॅग’धारक कारसाठी केवायव्हीची प्रक्रिया रद्द

देशातील ‘फास्टॅग’धारक कार, जीप आणि व्हॅनचालकांसाठी केवायव्हीची (नो युअर व्हेईकल) प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेत महामार्गांवर प्रवास करणाऱया लाखो कारचालकांना नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा दिला आहे. 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर कार, जीप आणि व्हॅनचालकांची केवायव्हीच्या किचकट प्रक्रियेतून सुटका होणार आहे.

सद्यस्थितीत गाडीवर फास्टॅग बसवलेल्या वाहनधारकांना किचकट प्रक्रियेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा केवायव्हीच्या प्रक्रियेसाठी बँक वा एजन्सीकडून कॉल, मेसेज आणि वारंवार कागदपत्रांची मागणी केली जात आहे. वाहनाची सर्व वैध कागदपत्रे असूनही ग्राहकांना हा मनस्ताप सोसावा लागतो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित किचकट प्रक्रियाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या फास्टॅगधारकांनाही किचकट प्रक्रियेतून दिलासा मिळणार आहे.